दुष्काळाने पीडित शेतकऱ्यांना यापूर्वी केंद्र व राज्यातील सरकारांनी वेळोवेळी भरीव मदत केली. परंतु सध्याचे सरकार मात्र अशी मदत करताना दिसत नाही. सध्या सत्तेवर असलेले सरकार शहरी भाग व उद्योगपतींकडेच अधिक लक्ष देणारे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास किंमत मिळाली नाही तरी चालेल. परंतु शहरी भागातील लोकांना भाववाढीची झळ बसू द्यायची नाही, हेच सध्याच्या सरकारचे धोरण दिसते, असा आरोप करतानाच शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव न मिळाल्यास प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला. मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, असेही पवार यांनी सांगितले. मराठवाडय़ातील दुष्काळपीडित भागाच्या दोन दिवसांच्या पाहणी दौऱ्यावर पवार यांचे सकाळी आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
शहरातील डॉ. रफीक झकेरिया संकुलात उभारलेल्या डॉ. रफीक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निग अँड अॅडव्हान्स रीसर्च, तसेच डॉ. रफीक झकेरिया स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते दुष्काळ पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. चितेपिंपळगाव येथील दुष्काळी स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच जळालेल्या मोसंबी बागांची पाहणी केली. वाकोळणी व जामखेड गावांनाही त्यांनी भेट दिली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, विनोद पाटील, अभिजित देशमुख, महिला आघाडीच्या मेहराज पटेल, अभिषेक देशमुख, डॉ. बाळासाहेब पवार, अय्युब खान आदी उपस्थित होते.