वैद्यकीय शाखेची पदवी घेऊन पुढे प्रशासनात उच्चपदावर कार्यरत अधिकाऱ्यांचे करोना काळात मिळालेले दुहेरी मार्गदर्शन जिल्हा सुरक्षित ठेवण्यास मोलाचे ठरले आहे, अशा भावना आज ‘डॉक्टर डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त झाल्या.

जिल्हा प्रशासन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टर दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत सेवाकार्यात अग्रेसर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय पदवी घेऊन सनदी सेवेत आलेले पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांचा आयएएमचे डॉक्टर्स संजय मोगरे, विपिन राउत, डी. बी. पूनसे, शंतनू चव्हाण व सचिन पावडे यांनी शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

तेली आणि ओंबासे यांनी प्रशासनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्या वैद्यकीय ज्ञानाद्वारे मार्गदर्शनही केले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्हा सुरक्षित राहण्यात त्यांचे योगदान महत्वाचे ठरल्याची भावना डॉक्टरांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी प्रशासनाला या संकटकाळात वर्ध्यातील डॉक्टर मंडळींच्या वैद्यकीय ज्ञानाचाच नव्हे तर सामाजिक सेवेतही लाभ मिळाल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी सेवाग्रामचे डॉ. सुबोध गुप्ता, डॉ. सुमित जाजू तसेच सावंगीचे प्रशासकीय अधिकारी उदय मेघे यांचाही गौरव करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले व निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यावेळी उपस्थित होते.