निवारागृहात असणाऱ्या मजुरांच्या हाती आज कामगार दिनी  वही-पेन देत त्यांच्या शालेय आठवणींना दिलेला उजाळा मजुरांसाठी आनंददायी ठरला.

शिक्षक परिषदेतर्फे आज या उपक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये करण्यात आले होते. परिषदेतर्फे त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था जेवणासह सांभाळल्या जात आहे, आज कामगार दिनी या मजुरांना पेन वही देऊन लेखन काम करण्यास सुचविण्यात आले. मात्र नेमकं काय लिहायचं? असा प्रश्न त्यांना पडला तेव्हा, लॉकडाउन मधील माझा अनुभव या विषयावर त्यांना लिहते करण्यात आले.

यानंतर एरवी दगड काम करणाऱ्या या हातातून आभारचे बोल उमटले, आपल्या पगारातून खर्च करीत तहान भूक भागविणारे शिक्षक आमच्या कुटुंबातील सदस्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, काहींनी मिळालेला आश्रय व त्यातील अनुभव कायमची आठवण म्हटले, गावी जाऊ तेव्हा याच आठवणी कुटुंबास सांगणार असल्याचे ते म्हणाले, या भागातील रुचकर जेवणाची नोंद काहींनी टिपली, अशा वेगवेगळ्या अनुभवांना त्यांनी व्यक्त केल्याचे शिक्षक नेते अजय भोयर यांनी सांगितले, दोन वेळच्या भुके पलीकडे मानवी भावना सांभाळणे सुद्धा महत्वाचे असते, विरंगुळा म्हणून आज या मजुरांना मिळालेले लेखन कार्य त्यांच्या साठी आनंदी क्षण देणारे ठरले, हे निश्चित होते.