माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड प्रेमापोटी ‘लातूर-नांदेड’ वाद ते मुख्यमंत्री असताना आयुक्तालयानिमित्ताने हेतुपुरस्सर सुरू झाला. तो आता बासनात गुंडाळून ठेवला गेला असला तरी लातूरची रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला जात आहे. मात्र त्यातूनच लातूरकर-नांदेडकर यांचा रस्त्यावरील संघर्ष सुरू झाला आहे!
विलासराव देशमुख यांनी ठरवले असते, तर आयुक्तालय लातूरला के व्हाचे झाले असते. मात्र विलासरावांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी अशोकरावांनी आपल्या कारकिर्दीत आयुक्तालयाचा वाद उकरून काढला. लातूरकरांचा संताप लक्षात घेऊन चव्हाणांना आपली तलवार म्यान करावी लागली व लातूरकरांसमोर नमते घ्यावे लागले. आयुक्तालयाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. नांदेड व लातूर अशा दोन्ही ठिकाणी स्वतंत्र आयुक्तालय व्हावे, हा समझोता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने झाला असला तरी तसा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही. याची अंमलबजावणी कधी होईल, हे सांगता येत नाही.
विलासरावांनी लातूर ते मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी केलेल्या परिश्रमाला तोड नाही. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत सातत्याने त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. प्रथमत: लातूर ते लातूर रोड, त्यानंतर लातूर ते कुर्डूवाडी टप्प्याचे काम पूर्ण केले. लातूर-मुंबई रेल्वे सुरू झाली. काही कारण नसताना लातूरकरांना खिजवण्याच्या हेतूने २०११ मध्ये चव्हाणांनी उन्हाळी सुटीतील खास बाब म्हणून प्रवाशांचा प्रतिसाद पाहण्यासाठी मुंबईहून लातूरला येणारी रेल्वे नांदेडपर्यंत वाढविण्याचे ठरवले.
लातूर ते नांदेड हे बसचे अंतर अवघे १३० किलोमीटरचे, तर रेल्वेने गेल्यास २२० किलोमीटरचे अंतर आहे. लातूर रोड व परळी रेल्वेस्थानकात इंजिन बदलावे लागत असल्यामुळे दोन्ही ठिकाणी मिळून किमान एक तास वेळ जातो. लातूर ते नांदेड प्रवासाला १०० रुपये लागतात, तर रेल्वेने जाण्यासाठी ८० रुपये तिकीट व रेल्वेपर्यंत रिक्षाचे पैसे ४० रुपये असे १२० रुपये लागतात. त्यामुळे नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसादच न मिळाल्यामुळे ही उन्हाळी रेल्वे बंद करावी लागली.
आता नव्याने जुनाच प्रयोग केला जाणार आहे. लातूरहून नांदेडला पाठवल्या जाणाऱ्या रेल्वेला सहा बोगी जोडल्या जाण्याचा प्रस्ताव आहे. सध्या रेल्वेला १८ बोगी आहेत. नव्याने सहा जोडल्यास त्यांची संख्या २४ होते. लातूर, उस्मानाबाद व बार्शी या तीन रेल्वेस्थाकांवरील प्लॅटफॉर्मची क्षमता केवळ १८ बोगींची आहे. त्यामुळे २४ बोगींची रेल्वे आली, तर ती प्लॅटफॉर्मवर थांबणार कशी व त्यात प्रवाशांची चढ-उतार होणार कशी, हा प्रश्न आहे. नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी नंदीग्राम व देवगिरी एक्स्प्रेस या दोन रेल्वे असताना पुन्हा नव्याने लातूरची रेल्वे तिकडे वळवण्याचे कारण काय, असा लातूरकर मंडळींचा सवाल आहे. कोणतीही रेल्वे ही एखाद्या जिल्ह्य़ाची असत नाही, असा उपदेशाचा डोस लातूरकरांना अशोकराव चव्हाण यांनी पाजला. यानिमित्ताने लातूर व नांदेड जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होण्याची टिपणीही त्यांनी केली. वस्तुत: रेल्वे कोणत्या जिल्ह्य़ाची असत नाही हे न कळण्याइतके लातूरकर अशिक्षित नाहीत व रेल्वेमुळे लातूर-नांदेड जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल, याचा अर्थ न कळण्याइतके लातूरकर निर्बुद्ध नक्कीच नाहीत! लातूरच्या प्लॅटफॉर्मवर मुंबईहून आलेली रेल्वे दिवसभर थांबून असते. रेल्वेचे आर्थिक नुकसान होऊ नये व प्रवाशांचीही सोय व्हावी, यासाठी लातूर जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने अनेक पर्याय रेल्वे प्रशासनासमोर ठेवले आहेत. दुर्दैवाने रेल्वे प्रशासन याचा गांभीर्याने विचार करीत नाही. लातूरची रेल्वे फायद्यात चालणारी आहे. त्याचा फायदा आणखी वाढावा, अशी लातूरकरांची अपेक्षा आहे. त्यामुळेच मुंबईहून लातूरला आल्यानंतर ती रेल्वे पुन्हा पुण्यापर्यंत नेऊन परत लातूरला आणल्यास प्रवाशांची सोय होईल. ती रेल्वे नांदेडला नेण्यामुळे नांदेडहून मुंबईला आरक्षित डब्यातून जाणारे प्रवासी फारसे राहणार नाहीत. कारण प्रवासाला वेळ अधिक लागणार आहे. मात्र, सामान्य प्रवाशांची संख्या जनरल बोगीत अधिक राहील. बोगी भरलेली असल्यामुळे लातूर परिसरातून जाणाऱ्या गोरगरीब नागरिकांची मात्र गैरसोय होईल. रेल्वे सेवा सुरू होऊनही सामान्य प्रवाशांना त्याचा लाभ होणार नाही, यासाठीच लातूरची रेल्वे नांदेडपर्यंत नेऊ नये, अशी लातूरकरांची रास्त मागणी आहे. नांदेडकरांनी त्याला राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनविला असल्यामुळे व आता विलासराव नसल्यामुळे लातूरकरांवर कुरघोडी करणे सहज सोपे आहे, असा त्यांचा समज झाला असल्यामुळे वातावरण तापवले जात असल्याची चर्चा होत आहे.