नारायण राणे भाजपात गेले असले तरी त्यांचे तिथे मन रमत नाही. आजही त्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता असल्याचे सूचक वक्तव्य काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांसमोर बोलताना केले. नेवासा येथील काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांसमोर त्यांनी हे वक्तव्य केले.

काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते आज परतीच्या वाटेवर असल्याचे सांगत पुढील निवडणुकीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काँग्रेसचेच दिसतील, असा दावा ही त्यांनी केला. राणे हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते. पण त्यांचे मन तिथे रमते का, असा सवाल त्यांनी केला.

राणे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला होता. शिवसेनेत त्यांनी विविध पदे भूषविली होती. तत्कालीन युती सरकारच्या अखेरच्या काळात त्यांनी काही काळ मुख्यमंत्रिपदही भूषवले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आघाडी सरकारमध्येही त्यांनी विविध मंत्री पदे भूषवले. परंतु, त्यांच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसमध्ये अनेकांबरोबर त्यांचे कधी पटलेच नाही. त्यातच मध्यंतरी ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर गेले. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचीही त्यांनी स्थापना केली. परंतु, या कालावधीत त्यांच्या राजकारणाला स्थैर्य मिळाले नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही भाजपाने त्यांना जाहीरनामा समितीत स्थान दिले आहे.

आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपात युतीची शक्यता असल्याने राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच थोरात यांनी सूचक वक्तव्य केल्याने राणे पुन्हा काँग्रेसमध्ये येतील का हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.