रेल्वेऐवजी जलवाहिनीद्वारे पुरवठा करण्याची योजना
पावसाअभावी शुष्क पडत चाललेल्या धरणांतून पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याच्या पाश्र्वभूमीवर लातूर शहराला आता महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा पर्याय व्यवहार्य नसल्याने जलवाहिनीद्वारे लातूपर्यंत पाणी आणण्यात येणार आहे.
लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात केवळ १.२९ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा झपाटय़ाने आटत चालला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने १५ दिवसांतून एकदा पाणी देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. परंतु आता हे प्रमाण महिन्यातून एकदा पुरवठा असे करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात धनेगाव धरणात विहीर खोदली जाणार असून भूजल विभागाच्या अंदाजानुसार त्यात पाणीसाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच पद्धतीने नागझरी जलाशयातही विहीर खोदली जाणार आहे. सद्यस्थितीत शहराच्या विविध भागांत दररोज ३९ टँकर्सनी पाणीपुरवठा केला जात आहे. मनपातर्फे टँकर सुरू असले तरी प्रत्यक्षात धनदांडगी मंडळीच धाकदपटशा दाखवून पाणी पळवत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक टँकरवर महापालिकेचा स्वतंत्र कर्मचारी तनात करण्यात येत असून कोणाच्याही घरात थेट पाणी दिले जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. जे पाणी खरेदी करू शकत नाहीत, अशा सामान्यांसाठीच महापालिकेने सुविधा देऊ केली आहे.
रेल्वेने पाणीपुरवठा अशक्य..
उजनीतून लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवण्याचा पर्याय समोर आला होता. रेल्वेने पाणी आणायचे, तर पंढरपूर रेल्वेस्थानकापर्यंतची जलवाहिनी व लातूर रेल्वेस्थानकावरून पाण्याच्या टाकीपर्यंत वाहिनीचा खर्च ४ कोटी व दरमहा वाहतुकीचा खर्च ७ कोटी. सहा महिने पाणी घ्यायचे झाल्यास ४६ कोटी खर्च लागेल असा अंदाज आहे. त्याऐवजी उजनीतून उस्मानाबादला दररोज १६ दशलक्ष लिटर पाणी खेचता येईल इतकी जलवाहिनी आहे. उस्मानाबाद शहराला दररोज ६ दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. तेवढीच पाणी खेचण्याची क्षमता अस्तित्वात आहे. संपूर्ण पाणी खेचता येईल, इतकी यंत्रसामुग्री बसवली व धनेगावमधून लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीपर्यंत उस्मानाबादहून वाहिनी जोडल्यास ३२ कोटी रुपये खर्च येईल. वाहतुकीवरील खर्चही वाया जाणार नाही, असा प्रस्ताव लातूर महापालिकेने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत तातडीने याची योग्यता तपासण्याचे आदेश दिले आहेत.

सांगलीत १० टक्के कपात
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सांगली महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज व कूपवाड शहरात १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणी कपातीचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात अमलात आणला जाणार आहे.

पुण्यात १५ टक्के कपात : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे महापालिकेने १५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून नागरिकांनी याची तीव्रता लक्षात घेऊन कमीत कमी पाणी वापरण्याची स्वतला सवय लावून घ्यावी. आता प्रत्येक टँकरवर महापालिकेचा स्वतंत्र कर्मचारी तनात करण्यात येत असून कोणाच्याही घरात थेट पाणी दिले जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
– लातूर महापालिका इतर शहरांमधील  पाणीपुरवठा स्थिती
नंदुरबार – एक दिवसाआड
धुळे – दोन दिवसांआड
जळगाव – तीन दिवसांआड
नगर – दररोज
विदर्भ – दररोज
रत्नागिरी – दररोज
रायगड – दररोज