लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : टाळेबंदी आणि वाढलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्यामुळे  एका बार चालकाने त्याची पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर त्या बार चालकाने आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्ह्याची उकल करत सोलापूर पोलिसांनी एका खासगी सावकाराला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

१३ जुलै रोजी सोलापूर शहरातील जुन्या पुणे नाक्याजवळील हांडे प्लॉटमध्ये राहणाऱ्या अमोल अशोक जगताप (वय ३७) या ऑर्केस्ट्रा बार चालकाने त्याची पत्नी मयुरी (वय २७) हिच्यासह मुले आदित्य (वय ७) व आयुष (४) यांना गळफास देऊन खून करून नंतर स्वतः आत्महत्या केली होती. त्याचे पुणे रस्त्यावर कोंडी येथे गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा नावाचा बार होता. परंतू करोनाच्या वाटेने आलेल्या टाळेबंदीमुळे बार बंदच होते. त्यामुळे त्याने सावकारांकडून कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाची रक्कम ६० ते ७० लाखांच्या घरात होती.

यासंदर्भात मृत अमोल यांचे बंधू राहुल जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना मृत अमोल जगताप यास व्यंकटेश पंपय्या डंबलदिन्नी (रा. हैदराबाद रोड, सोलापूर) या खासगी सावकाराने कर्जवसुलीचा सतत तगादा लावला होता. धमकावणे, शिवीगाळ करणे, मुलांच्या अपहरणाची धमकी देणे अशा माध्यमातून सातत्याने त्रास दिला जात असल्याची बाब समोर आली. सावकार डंबलदिन्नीच्या असह्य त्रासाला वैतागून अमोल जगताप याने स्वतःच्या पत्नीसह दोन्ही मुलांची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणास सावकार डंबलदिन्नी हाच जबाबदार असल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले.