रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या आगरकोट किल्ल्यातून एक तोफ चोरीला गेली आहे. कुलाबा किल्ला आणि रेवदंडा किल्ला अर्थात आगरकोट किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहेत. या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात प्री वेडिंग शूट केली जातात. त्यासाठी संमतीही घेतली जात नाही. रात्री दारु पार्ट्याही केल्या जातात. या किल्ल्याची नोंद पुरातत्त्व खात्याकडेही आहे. मात्र ती अर्धवट आहे. कारण किल्ल्यातील चर्च, सातखणी बुरुज हेच संरक्षित स्मारक म्हणून नोंद आहेत. तटबंदी, बुरुज, शिलालेख व तोफा यांचा यामध्ये समावेश नाही. गेल्या काही दिवसांपासून तोफ क्रमांक २ चोरीला गेली आहे. ही तोफ मंदिराच्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली होती. मात्र आता ती तिथे नाही. या प्रकरणी पोलिसात तक्रारही देण्याचाही प्रयत्न झाला आहे. मात्र आम्ही पुरातत्त्व खात्याचीच तक्रार नोंदवून घेऊ असे पोलिसांनी म्हटलं आहे.

एक तोफ जशी चोरीला गेली तशा इतर तोफाही चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालावे असे दुर्गप्रेमींना वाटते आहे. मात्र पोलीस पुरातत्त्व खात्याच्या तक्रारीशिवाय इतर कुणाचीही तक्रार घेण्यास तयार नाहीत. मे २०१९ मध्ये या किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी तब्बल ३६ तोफा असल्याचे समोर आले होते. आता एक तोफ चोरीला गेली तशाच इतरही जाऊ शकतात अशी शक्यता आहे. मात्र याप्रकरणी काय करायचं हा प्रश्न दुर्गप्रेमींना पडला आहे.