महिला दिनानिमित्त ऊसतोड मजुराच्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन तिच्या उच्च शिक्षणापर्यंत सर्व खर्च करण्याची घोषणा करताच इतर अधिकाऱ्यांनीही गावदऱ्यातील गरीब कुटुंबामधील तब्बल ३२ मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले. जिल्हास्तरावर सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंर्गत गरीब मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यास तब्बल एक कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांनी घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महिला दिनी घेतलेल्या या निर्णयाने गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी बळ मिळणार आहे.
महिला दिनानिमित्त धारूर तालुक्यातील गावंदरा येथे जि. प. शाळेत शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्या उपस्थितीत गावातील उच्च शिक्षित मुला-मुलींच्या मातांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सानप यांनी महिलांना सक्षम करण्यास शिक्षण आवश्यक असल्याचे सांगताना गावातील शिकण्याची इच्छा असलेल्या गरीब कुटुंबामधील एका मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा मनोदय व्यक्त केला. आपले आई-वडील ऊसतोडणीसाठी गेलेल्या अश्विनी बंडूघुले या इयत्ता सहावीत शिकत असलेल्या मुलीने सर्वासमक्ष उभे राहून शिकून जिल्हाधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. सानप यांनी या मुलीचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत खर्च करण्याची घोषणा केली. या वेळी उपस्थित इतर अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी तब्बल ३२ मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. साहजिकच ऊसतोडणी कामगार असलेल्या या गावातील मुलींसाठी महिला दिन शिक्षणासाठी नवे पंख देणारा ठरणारा ठरला.
जिल्हास्तरावर सीईओ नामदेव ननावरे यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची आढावा बठक झाली. शिक्षणाधिकारी सानप यांनी गावंदरा येथील शिक्षणासाठी मुली दत्तक घेतल्याची माहिती देऊन इतरांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन केले. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापती यांच्या संयुक्त खात्यातून सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेंतर्गत गरजवंत मुलींना शिक्षणासाठी वर्षांला ३ हजार रुपयांची मदत केली जाते. या खात्यात १७ लाख निधी जमा असून व्याजाच्या रकमेतून दरवर्षी ६०० मुलींना मदत केली जाते. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांनी या निधीत ६० लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. सीईओ ननावरे, विस्तार अधिकारी ईश्वर मुंडे यांनी वैयक्तिक १५ हजार रुपये, तर केंद्रप्रमुख कल्याण बडे यांनी ३० हजार रुपये दिल्यानंतर सर्वानुमते या निधीत एक कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.