गुटखा खाऊन मारलेली पिचकारी एका तरुणाच्या जीवावर बेतली असून, विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. मालेगावमध्ये रविवारी ही घटना घडली. मोहम्मद यासिन असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आपल्या भावाला भेटण्यासाठी रविवारी मालेगावातील रमझानपुऱ्यामध्ये आला होता. भाऊ ज्या इमारतीमध्ये राहात होता. तिथे गेल्यावर मोहम्मदने गुटखा खाल्ला. इमारतीच्या खिडकीतून खाली थुंकत असताना जवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांवर त्याची पिचकारी उडाल्याने त्याला तीव्र दाबाचा विजेचा धक्का बसला. यामुळे तो जागीच कोसळला. नातेवाईकांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. गुटख्याची पिचकारी विजेच्या तारांवर पडल्याने विजेचा दाब उलटा आला आणि त्यामुळे मोहम्मदला विजेचा धक्का बसला. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केलेली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 10:58 am