लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : अकोला जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून, शनिवारी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३० जणांचे बळी गेले आहेत. शहर व जिल्ह्याच्या विविध भागातील १२ नवीन रुग्णांचे करोना तपासणी अहवाल शनिवारी सकारात्मक आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५७० वर पोहोचली. सध्या ११७ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यात करोना पसरण्याचा झपाटा सुरूच असून, मृत्यूची संख्याही वाढत आहे. शनिवारी दिवसभरात एक मृत्यू आणि १२ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण १२३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १११ अहवाल नकारात्मक, तर १२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत ४२३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आले. त्यात आज सोडण्यात आलेल्या ३५ जणांचा समावेश आहे. त्यातील ३० जण संस्थात्मक विलगीकरण, तर पाच जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, शनिवारी पहाटे ७१ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते साई नगर डाबकी रोड येथील रहिवासी होते. त्यांना २४ मे रोजी दाखल करण्यात आले होते.

आज सकाळच्या अहवालानुसार सकारात्मक आलेल्या सात रुग्णांमध्ये दोन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण बाळापूर, आलेगाव पातूर तसेच अकोला शहरातील रामदास पेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदोस कॉलनी येथील रहिवासी आहेत. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी पाच रुग्णांची भर पडल्याने आज दिवसभरात एकूण १२ रुग्ण वाढले. सायंकाळी सकारात्मक आढळून आलेल्या पाच रुग्णांमध्ये दोन पुरुष व तीन महिला आहेत. यामध्ये अकोट फैल, गायत्री नगर, शहर कोतवाली, मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्ण आहेत. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहे. सातत्यपूर्ण वाढणाऱ्या मृत्यू व रुग्णांच्या संख्येमुळे अकोला जिल्हा प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

५०० चमूद्वारे शहरातील प्रत्येकाची तपासणी
शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महानगर क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. ५०० चमूद्वारे शहरातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून कुटुंबातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ‘पल्स ऑक्सिमीटर’द्वारे प्रत्येकाच्या ऑक्सिजन पातळीची नोंद करून घेण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसह आजारांची पार्श्वभूमी असलेल्यांची विशेष नोंद होईल. करोनापासून बचावासाठी ती माहिती उपयुक्त ठरणार असल्याने सर्व नागरिकांनी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.