लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला शहरातील आणखी एका करोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १५ जणांचे बळी गेले आहेत. विविध भागातील १८ नवे करोनाबाधित रुग्णही आज बुधवारी आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १८६ वर पोहोचली. सध्या १११ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात करोनाचा कहर चांगलाच वाढत आहे. रुग्ण संख्येसोबतच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. बुधवारी आणखी १८ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील एकूण १८१ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १६३ अहवाल नकारात्मक तर १८ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १८६ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील १५ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ६० जणांनी करोनावर मात केली. सद्यास्थितीत १११ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, एका ६२ वर्षीय करोनाबाधित महिला रुग्णाचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान काल रात्री मृत्यू झाला. ती महिला न्यू भीमनगर भागातील रहिवासी होती. सोमवार, ४ मे रोजी त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल १८ रुग्णांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला. त्यामध्ये महिला व पुरुष प्रत्येकी नऊ जण आहेत. त्यातील सात जण खैर मोहम्मद प्लॉटमधील रहिवासी आहेत. गवळीपूरा, राम नगरमधील प्रत्येकी तीन जण, बापू नगर अकोट फैल, सराफा बाजार, अकोट फैल, जुने शहर पोलीस ठाणे, जुने आळशी प्लॉट भागातील प्रत्येकी एक जण आहे. शहरातील करोनाबाधितांच्या संख्येत भरीव वाढ होत असल्याने प्रतिबंधित क्षेत्र चांगलेच वाढले आहे. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

३२.२५ टक्के रुग्ण करोनामुक्त

अकोला शहरातील ३२.२५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८६ पैकी एकूण ६० रुग्णांनी करोनावर मात केली. काल रात्री ४१ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मोमिनपूरा पाच, सिंधी कॅम्प येथील चार, कृषी नगर सहा, बैदपूरा सात, न्यू भीमनगर तीन, कोठडी बाजार दोन, कंवरनगर दोन, भीमनगर, मोहम्मद अली रोड, कमला नगर, शिवाजीनगर, शंकरनगर अकोट फैल, जुने शहर, सुधीर कॉलनी, फतेह चौक, अंत्री, लाल बंगला, राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी एक जण आहे.

३४८ अहवाल प्रलंबित

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २२१३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०१३, फेरतपासणीचे ९८ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १८६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. आजअखेर एकूण १६७९ अहवाल नकारात्मक, तर १८६ जणांचे अहवाल सकारात्मक आले. अद्यााप ३४८ अहवाल प्रलंबित आहेत.