शहराच्या औद्योगिक वसाहतीजवळील नारेगाव कचरा डेपोजवळ रसायनाचा स्फोट होऊन कचरावेचक महिलेचा जागीच मृत्यू झाला. नंदाबाई कडुबा भालेराव असे या महिलेचे नाव आहे. हा स्फोट नक्की कोणत्या रसायनामुळे झाला, याचा तपास संध्याकाळपर्यंत लागू शकला नाही. स्फोटक कोणत्या प्रकारचे होते, याची तपासणी करण्यास नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. दरम्यान, स्फोटामागे कोणताही घातपात नव्हता, असे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले. दुपारी पावणेबाराच्या सुमारास स्फोटाचा प्रकार घडला.
क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीसमोर व व्होकार्टच्या पाठीमागे कचरा वेचण्यासाठी नंदाबाई भालेराव व त्यांची आई अशा दोघी गेल्या होत्या. वेगवेगळय़ा प्रकारचा कचरा गोळा करून गुजराण करणारी नंदाबाईची आई पाणी पिण्यासाठी थोडीशी दूर गेली, तेव्हा एकदम जोरदार आवाज झाला. स्फोटाच्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर नंदाबाईचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या भागात विविध औद्योगिक उत्पादने तयार होतात. विशेषत: रंग, कूलर आदी उत्पादने करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये रासायनिक द्रव्ये लागतात, ज्यामुळे स्फोट होऊ शकतो. ही रसायने कचऱ्यात टाकण्यात आली होती का, याचा तपास केला जात आहे. स्फोटाचा प्रकार कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दहशतवादविरोधी पथकातील अधिकारीही तातडीने पोहोचले. घडलेला प्रकार घातपाताचा नसावा, असे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे चावरिया यांनी सांगितले. तथापि, प्रयोगशाळेतील अहवालानंतर तपासाची पुढची दिशा नक्की केली जाईल, असेही ते म्हणाले.
स्फोटाची तीव्रता एवढी होती, की पाणी प्यायला गेलेल्या नंदाबाईच्या आईला वळून बघेपर्यंत मुलीचा मृतदेहच पाहावा लागला. स्फोटानंतर मृत महिला लांब फेकली गेल्याचे सांगण्यात आले.