लातूरहून सोलापूरकडे जाणारी बस (एमएच १४ बीटी १४३४) व सोलापूरहून लातूरकडे येणाऱ्या बसची (एमएच २० बीएल ११०९) समोरासमोर धडक होऊन एक जण ठार, तर आठ जण जबर जखमी झाले. लातूर तालुक्यातील पेठ येथे गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली.
लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसचा चालक डावीकडचा रस्ता सोडून उजव्या बाजूने बस चालवत होता. याच वेळी कळमनुरी आगाराची सोलापूर-कळमनुरी बस समोरून येत होती. दोन्ही बसची पेठनजीक समोरासमोर धडक झाली. या अपघातात पंडित निळकंठ उदगीरकर (वय ८२, मार्डी, तालुका तुळजापूर) या गंभीर जखमी वृद्धाचा उपचार चालू असताना मृत्यू झाला. एस. जी. धम्मगुंडे (वय ४८, परळी), डी. बी. जाधव (३०, बामणी), ए. पी. देशमाने (३४, तुळजापूर), प्रणिता देशमाने (२७, तुळजापूर), मुरलीधर िशदे (१८, औसा), परमेश्वर फड (३०, सिंधुदुर्ग), एस. टी. उटगे (चालक, वय ४५, औसा) व ए. के. सांगळे (चालक, कळमनुरी) हे जखमी झाले. जखमींना लातूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. लातूर-औसा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. खड्डेमय रस्त्यावर गेल्या काही दिवसांत अनेकांचे बळी गेले आहेत. गुरुवारचा अपघातही खराब रस्त्यामुळेच झाला.
टमटम उलटून महिला ठार, तिघे गंभीर जखमी
वार्ताहर, उस्मानाबाद
बलगाडीचे ‘जू’ टमटममध्ये आडवे टाकून नेले जात असताना, समोरून येणाऱ्या एका बलगाडीच्या चाकात ते अडकून टमटम उलटली. या अपघातात महिला जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. भूम शहरातील शासकीय दूध योजनेजवळ गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
भूम शहराचा गुरुवारी आठवडी बाजार असतो. बाजार उरकून रेखा सारंग वाघमारे (वय ४५), लीलावती साईराम गुंजाळ, गयाबाई दिगंबर सुके, हनुमंत शिवाजी माळी (वांगी, तालुका भूम) हे सर्व टमटममधून (एमएच २५ एन १००८) वांगी गावाकडे निघाले होते. टमटममधून बलगाडीस लागणारा ‘जू’देखील नेण्यात येत होता. शहरातील शासकीय दूध योजनेजवळ टमटममधील जू समोरून येणाऱ्या बलगाडीच्या चाकात अडकला. त्यामुळे टमटम उलटला. या प्रकारात रेखा वाघमारे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर लीलावती गुंजाळ, गयाबाई सुके व हनुमंत माळी हे तिघे गंभीर जखमी झाले. वाघमारे यांचा मृतदेह भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृताच्या नातेवाइकांनी गर्दी करून आक्रोश केला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी तिघांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.
दरम्यान, टमटममध्ये ठेवलेल्या आडव्या जूमुळेच ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. टमटममध्ये १५ प्रवासी असल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. मृतदेहासह बाजारातून प्रवाशांनी खरेदी केलेले वांगे, बटाटे, डाळी, साखर, शेंगदाणे आदी वस्तू घटनास्थळी विखरून पडल्याचे दिसून आले. टमटममधून धोकादायी ठरणाऱ्या वस्तूंची वाहतूक करणे बेकायदा असतानाही ते वाहून नेण्यात येत आहेत.