भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याविरुद्ध आपण केवळ आरोप केले नव्हते, तर वस्तुस्थिती सांगितली होती. येत्या आठ दिवसात गडकरी यांच्याविरुद्ध काही कागदपत्रे आपण देणार आहोत, असे आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्राच्या संयोजक अंजली दमानिया यांनी सांगितले.
काँग्रेसचे अस्तित्व आता संपत आले असून संपूर्ण देशभरात भाजप हाच आमचा मुख्य प्रतिस्पर्धी आह़े तसेच देशभरात कुठल्याही पक्षाशी युती करायची नाही, हे धोरण ‘आप’ने निश्चित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात महाराष्ट्राची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आपण अजित पवार, नितीन गडकरी या नेत्यांविरुद्ध लढणार असल्याचे दमानिया यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, आपण स्वत: नागपुरातून नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढणार नाही. किंबहुना, लोकसभेची निवडणूकच लढणार नाही, असे त्यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात स्पष्ट केले.
देशभरात कुठल्याही राजकीय पक्षाशी युती करायची नाही आणि कुणाला तशी इच्छा असेल तर त्या पक्षाने ‘आप’मध्ये विलीन व्हावे, हे आमचे धोरण ठरले आहे. हे न झाल्यास किमान त्यांच्या इच्छुक उमेदवाराने ‘आप’चे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारावे, ही आमची अट राहील, असेही त्या म्हणाल्या़.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 4:07 am