तोंडी कळवले, निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र मागील दोन वर्षांपासून शहराच्या रेणापूर नाक्यानजीक फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यास महापालिका प्रशासनाला वेळ मिळू शकत नाही. शहराला दहा दिवसांतून जेमतेम तासभर पाणी मिळते. त्यामुळे लातूरकर त्रस्त असताना गळतीमुळे मात्र दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मागील तीन वर्षांपासून मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मोठय़ा धरणांतील पाणीसाठय़ाने पावसाळय़ातही तळ सोडला नाही. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरणही तीन वर्षांपासून जोत्याखालीच आहे. त्यामुळे लातूरकरांवर १० दिवस साठवून ठेवलेले पाणी पिण्याची वेळ आली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिक चांगलेच त्रासून गेले आहेत. रेणापूर नाक्याजवळून गेलेली महापालिकेची जलवाहिनी दोन वर्षांपासून फुटली. पाणी आलेल्या दिवशी या वाहिनीतून हजारो लीटर पाणी वाया जाते, तसेच घाण पाणी जलवाहिनीत शिरते. ही वाहिनी दुरुस्त करण्याची मागणी अनेकांनी केली. निवेदने दिली. तोंडी कळवले, आंदोलनेही केली, मात्र दुरुस्तीकडे कोणीही लक्ष दिले नाही.