व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या  गांधीनगरमध्ये  मध्यरात्री घरफोडीनंतर पळण्याच्या तयारीत असलेल्या चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर चोरटय़ांनी  केलेल्या  दगडफेकीमध्ये  पोलीस कर्मचाऱ्यांसह एक नागरिक जखमी झाला आहे. गांधीनगर परिसरातील तावडे हॉटेल जवळील उड्डाणपुलाजवळ झालेल्या घटनेनंतर चोरटय़ांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला पण  शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना शिताफीने पकडले.

शहरांलगत असलेल्या गांधीनगरमधील काही दुकांनामध्ये शनिवारी मध्यरात्री २५ ते ३० वयाच्या चार चोरटय़ांनी चोरीचा प्रयो केला.  सुरक्षा रक्षकाच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्याने आरडा-ओरड केल्याने  चोरटय़ांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरी झालेल्या दुकानात पाहणी केली. यावेळी एका दुकानाच्या सीसीटिव्हीमध्ये चोरटे कैद झाले होते.

गांधीनगर पोलिसांनी तात्काळ शहरातील पोलीस ठाण्यांना याबाबत कळवत चोरटय़ांचे फुटेज अन्य पोलीस ठाण्याच्या  पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवून दिले. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे महेश गवळी व विजय इंगळे हे पोलीस कर्मचारी रात्री गस्त घालत होते. तेव्हा दोन संशयित व्यक्ती तावडे हॉटेलच्या दिशेने गेल्याचे त्यांना समजले. त्याचवेळी कागलकडून कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर एक अज्ञात व्यक्ती थांबला होता. त्याची शरीरयष्टी सीसीटिव्ही फुटेजमधील एका चोरटय़ाशी मिळती-जुळती असल्याने पोलिसांनी  चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटय़ाने लगेचच पळ काढला असता विजय इंगळे व महेश गवळी यांनी त्याला मोठय़ा शिताफीने पकडून त्याची झडती सुरू केली.

त्याचवेळी मागून आलेल्या इतर चोरटय़ांनी पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक सुरू केली. या हल्लय़ात पोलीस कर्मचारी महेश गवळी यांच्यासह  एक स्थानिक व्यक्ती  जखमी झाली.