भंगार म्हणून चोरलेल्या तोफगोळ्याचा स्फोट

नगर : शहराजवळील, केके रेंज या लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रातून भंगार म्हणून चोरलेला तोफगोळा फोडताना झालेल्या स्फोटात एकजण जागीच ठार झाला. भिवा सहादू गायकवाड (५५, रा. निमगाव घाणा, ता. नगर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी साडेदहा-अकराच्या सुमाराला केके रेंज या सराव क्षेत्रालगत घडली. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. केके रेंज या सराव क्षेत्रालगतच्या गावातून अशा घटना अनेकदा घडत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन किंवा संरक्षण विभाग त्याला प्रतिबंध घालू शकलेले नाही.

मनमाड रस्त्याच्या डाव्या बाजूला नगर, पारनेर व राहुरी या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर लष्कराचे केके रेंज क्षेत्र आहे. या क्षेत्रात लष्कराची युद्ध सरावाची प्रात्यक्षिके चालतात. या सरावावेळी रणगाडे व लढाऊ चिलखती वाहनातून डागण्यात आलेल्या तोफगोळ्यांचा काही वेळेस स्फोट होत नाही. असे तोफगोळे जमा करुन त्यातील धातू भंगार म्हणून विकून त्यावर उपजीविका करणारे अनेक कुटुंब परिसरातील गावात आहेत. असे चोरलेले तोफगोळे फोडताना अनेकदा स्फोट होतात, त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत.

अशा घटना टाळण्यासाठी सरावाच्या वेळी लष्कराकडून टेहाळणी मनोरे उभारले जातात तसेच सरावानंतरचे भंगार जमा करण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आलेला आहे. मात्र या यंत्रणांची नजर चुकवून अनेक तरुण धाडसाने या प्रतिबंधित क्षेत्रात जातात व स्फोट न झालेले तोफगोळे उचलून आणतात. त्यातील धातू भंगार म्हणून विकण्यासाठी तोफगोळे फोडले जातात, त्यातील तोफगोळ्यांचे स्फोट होतात. प्रतिबंधित क्षेत्र लष्कराने संपादित केलेले आहे. त्यापलीकडील तिन्ही तालुक्यांतील २३ गावातील सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्र या सरावासाठी दर पाच वर्षांसाठी संरक्षित केले जाते. सरावावेळी तोफगोळे, क्षेपणास्त्र यांच्या स्फोटाचे तुकडे या क्षेत्रात पसरतात. असे तुकडेही भंगार जमा करणाऱ्यांकडून गोळा केले जातात.

आज सकाळी स्फोट झालेला तोफगोळा भिवाजी गायकवाड यांच्याकडे कसा व के व्हा आला, याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळू शकली नाही. केके रेंज या सराव क्षेत्रातीलच माळरानावर गायकवाड हे एकटेच तोफगोळा फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्याचा स्फोट झाला. त्यांचा मुलगा विलास याने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक बोरसे आदींनी भेट दिली.

वाळुचोरीही

केके रेंज हे प्रतिबंधित क्षेत्र असले तरी त्या परिसरातून वाहणाऱ्या देव नदीपात्रातून वाळुतस्करीही मोठय़ा प्रमाणावर चालते. विशेषत: रात्री वाळुतस्करीची वाहने धावतात, महसूल व पोलीस विभागानेही अनेकदा त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. केके रेंजचा परिसर विस्तीर्ण, छोटय़ा टेकडय़ांनी वेढलेला व बेसुमार बाभळी वाढलेला आहे.