अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून तपासात सुरू असलेल्या दिरंगाईबाबत अंनिस राष्ट्रपतींना एक लाख पत्रे लिहिणार आहे, अशी माहिती अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी येथे दिली. राज्य सरकार सीबीआयला तपासात पुरेसे सहकार्य करीत नसल्याचा आरोपही डॉ. दाभोलकर यांनी या वेळी केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येला येत्या २० ऑगस्टला दोन वष्रे पूर्ण होत आहेत. मात्र, या हत्या प्रकरणी तपासात काही प्रगती झाली नाही. सीबीआयकडे हा तपास देऊन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. मात्र, मारेकरी व सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. याचा निषेध म्हणून २० जुल ते २० ऑगस्ट दरम्यान राज्यभरात प्रेरणा संकल्प मेळावे घेतले जात आहेत. मेळाव्यादरम्यान राष्ट्रपतींना पाठविण्यात येणारी पत्रे लिहिली जात आहेत. मेळाव्यानिमित्त डॉ. हमीद दाभोलकर शुक्रवारी परभणीत आले होते.
सीबीआय तपास अधिकाऱ्याची ६ महिन्यांपूर्वी बदली झाली. मात्र, याची कोणालाही कल्पना नाही. राज्य सरकार सीबीआयला तपासात पुरेसे सहकार्य करीत नाही. तसेच आमच्या कुटुंबाला विश्वासात घेत नाही, असाही आरोप डॉ. हमीद यांनी केला. याचा निषेध म्हणूनच राष्ट्रपतींना एक लाख पत्रे लिहिली जाणार आहेत. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर के हत्यारों को कब पकडा जायेगा’ या आशयाचे पत्र राष्ट्रपती, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली ११०००४ या पत्यावर लिहून निषेध नोंदवावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
खुनाचा तपास आता न्यायालयाच्या देखरेखीत करण्याची मागणी करणारी याचिका हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी व तपासाचा पाठपुरावा, म्हणून ‘िहसा के खिलाफ मानवता की ओर प्रबोधन अभियान’ राबविण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशभर समविचारांची ही निषेध मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये निदर्शने, मोच्रे, प्रबोधन कार्यक्रम यांचा समावेश आहे. अंनिसच्या शिष्टमंडळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचेही ते म्हणाले. जात पंचायतीविरोधात कायदा करण्यासाठी अंनिस पाठपुरावा करीत असून, विवेकी जोडीदार निवडण्याचे अभियान सुरू केल्याचे डॉ. हमीद यांनी सांगितले.
अंनिसचे रौप्यमहोत्सवी वर्ष गतवर्षी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेमुळे साजरे केले नाही. या वर्षी यानिमित्त ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान पुण्यातील शिवशंकर सभागृहात राष्ट्रीय अधिवेशन आणि भारतातील विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद आयोजित केल्याची माहिती प्रधान सचिव प्रा. माधव बावगे यांनी या वेळी दिली. अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मानवतकर, प्रसन्न भावसार, मुंजाजी कांबळे, प्राचार्य विठ्ठल घुले, सुभाष जाधव, दत्तराव जाधव, डॉ. खापरे, नेमीनाथ जैन आदींची उपस्थिती होती.