आधुनिक संदेशवहनातील जलद व परिणामकारक साधन म्हणजे ई-मेल. मात्र, या माध्यमातून पाठविलेल्या एका तातडीच्या पत्रानेच मराठवाडय़ातील नामांकित सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आपल्या गोतावळय़ातील नवीन सभासद करून घेण्याची संस्थाध्यक्षांची नेपथ्यरचना ‘फेल’ केल्याची माहिती समोर आली आहे.
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी वृद्धिंगत व लोकआदरास पात्र केलेली ही संस्था आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. पण गोविंदभाईंच्या पश्चात त्यांच्या, तसेच पूर्वसुरींपैकी अनेकांच्या परिवारातील एकाही सदस्याला संस्थेचे सभासद करण्याची कृतज्ञता न दाखवणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्या निकटची, तसेच सोयीची नावे जमवून त्यांना संस्थेचे सभासद करून घेण्याचा लहरी प्रयत्न गेल्या आठवडय़ात केला, पण संस्थेच्या दोन ज्येष्ठ सभासदांच्या सजगतेमुळे तो फसल्याचे स्पष्ट झाले.
स. भु. शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक गेल्या आठवडय़ात दि. १०ला झाली. या बैठकीआधी संस्थेचे माजी सहचिटणीस अरुण रामचंद्र मेढेकर यांनी दि. ७ला संस्थाध्यक्ष दिनकर बोरीकर यांना पत्र देऊन संभाव्य सभासद करून घेण्यात आले नाही. पूर्वसुरींबद्दलच्या या अनास्थेबद्दल मेढेकर यांनी खेद व्यक्त केला, तरी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत दि. १०च्या बैठकीत घराणेशाहीचा झेंडा फडकविणारी अतिविशिष्ट नावे संस्था सभासदांच्या यादीत विराजमान करण्याची तयारी झाली होती. नव्या नावांमध्ये माजी वादग्रस्त सरचिटणिसाच्या मुलीच्या नावाचा समावेश होता.
या पाश्र्वभूमीवर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य अॅड. उदय बोपशेट्टी यांनी दि. १०ला संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक होण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष, अन्य पदाधिकारी व सदस्यांना उद्देशून ‘ई-मेल’द्वारे तातडीचे पत्र पाठविले. नवीन सभासद करून घेण्याच्या विषयावर त्यांनी काही कायदेशीर व तांत्रिक मुद्दे या पत्रात मांडले. बैठक सुरू झाली असतानाच त्यांचे हे पत्र संस्थाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांसमोर गेले.
बैठकीच्या कामकाजपत्रिकेतील विषयांमध्ये नवीन सभासदांच्या नावांना मान्यता देण्याचा विषय नव्हताच, पण अध्यक्षांनी एक यादी तयार ठेवली व आयत्या वेळच्या विषयांमध्ये नवीन सभासदांना मान्यता घेण्याची तयारी केल्याची बाब मंडळातील एक-दोन पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. काही माजी पदाधिकाऱ्यांचा वारस (मुलगा किंवा मुलगी), तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या निकटच्या वर्तुळातील काहींना सभासद करून घेतले जाणार होते. मेढेकर व बोपशेट्टी यांच्या म्हणण्यानुसार २० ते ३०जणांना संस्थेत मागील दाराने प्रवेश दिला जाणार होता, पण बोपशेट्टी यांनी त्यांच्या पत्रात उपस्थित केलेले घटनात्मक मुद्दे ग्राहय़ मानत कार्यकारी मंडळातील एका ज्येष्ठ सदस्याने खडे बोल सुनावल्यानंतर नवीन सभासद नोंदणीची योजना बारगळली, असे सांगण्यात आले. तत्पूर्वी माजी सरचिटणीस व नियामक मंडळातील एक सदस्य यांच्यात याच मुद्यावर शाब्दिक चकमक झडली.
औरंगाबाद, मराठवाडा आणि बाहेर विविध क्षेत्रांत मोठय़ा हुद्यांवर काम करणारे अनेक जण स.भु.चे माजी विद्यार्थी आहेत. यातील अनेकांनी सढळ हस्ते संस्थेला भरीव मदतही केली. अशांपैकी काही, तसेच संस्थेत दीर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेले कर्मचारी सभासद होण्यास इच्छुक आहेत,पण अनेकांना डावलून सोयीच्या मंडळींना सभासद करण्याचा प्रयोग डॉ. बापू काळदाते यांच्या कार्यकाळात झाला होता. या सभासदांमध्ये विद्यमान अध्यक्षांच्या डॉक्टर कन्येचा समावेश आहे. त्यानंतर नवीन सभासदांबाबत र्सवकष धोरण निश्चित करावे व या धोरणाला सर्वसाधारण सभेची मान्यता द्यावी, असे ठरले होते. पण धोरण नक्की न करता पुन्हा मागच्या दाराने काही सभासद करून घेण्याच्या प्रयत्नाला बोपशेट्टी यांनी विरोध करीत संस्थेच्या भव्य परंपरेला न शोभणाऱ्या, तसेच संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा विश्वासघात करणाऱ्या या संघटित प्रयत्नाला सक्षम न्यायव्यवस्थेसमोर आव्हान इशारा वरील पत्रातून दिल्यानंतर आयत्या वेळी येऊ घातलेला विषय थांबला.
स्थापनेची शंभरी साजरी करणाऱ्या या संस्थेच्या सभासदांची संख्या अवघी ७३ असून, त्यातही वयाची सत्तरी पार केलेले बहुसंख्य. गोविंदभाईंच्या पश्चात संस्थेचे स्वरूप काहींनी ‘बहुजन दुखाय’ केले असल्याचे मेढेकर यांच्यासारख्यांना वाटते.