नांदेड शहरालगत असलेल्या विष्णुपुरी येथे गावठी पिस्टल व जीवंत काडतूसे घेऊन फिरणार्‍या आरोपीस इतवारा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिध्देश्‍वर भोरे यांच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडल्याने खळबळ माजली. पोलिसांनी असे कृत्य करणार्‍यांच्या मुळाशी घाव घालावा, अशी चर्चा नागरिकांत होताना दिसत आहे.

नांदेड शहरात गावठी कट्टे, धारदार शस्त्रांचा वापर करुन सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार सर्रास होतांना दिसत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात गुंडाराज आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच विष्णुपुरी येथील जाज्वल्य काळेश्‍वर मंदीर परिसरात निलेश केशव डोंगरे हा तरुण गावठी पिस्‍टल व जीवंत काडतुसासह फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन पोलिसांनी धाड टाकत निलेश डोंगरे यास एका विना क्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल मिळून आले.

सदरची कारवाई इतवारा विभागाचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, कर्मचारी विक्रम वाकडे, शंकर गिनेवाड, शेख खाजा, संघरत्न गायकवाड यांच्या पथकाने केली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.