News Flash

सापाचे १ मिलिग्रॅम विष दीड लाखाला

विषाला मारक म्हणून औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सापांच्या विषाला आता ‘रेव्ह पाटर्य़ा’मध्ये मागणी वाढल्याने या विषाची किंमत सोन्याहून अधिक झाली आहे.

| August 19, 2015 02:22 am

विषाला मारक म्हणून औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सापांच्या विषाला आता ‘रेव्ह पाटर्य़ा’मध्ये मागणी वाढल्याने या विषाची किंमत सोन्याहून अधिक झाली आहे. एक मिलिग्रॅम विषासाठी तब्बल दीड लाख रुपये मोजण्यात येत असल्याने मादक द्रव्याची तस्करी करणारे माफिया आता सर्पविषाच्या तस्करीत गुंतले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात फोफावलेला मादकद्रव्याच्या निर्मितीतील सर्पविषाचा व्यापार आता देशांतर्गतही तेवढय़ाच वेगाने फोफावत असून मुंबईपाठोपाठ नागपूर हे आता या तस्करीचे दुसऱ्या क्रमांकाचे केंद्र बनत चालल्याचे अलिकडच्या कारवायांवरून स्पष्ट झाले आहे.
चीनमध्ये अनेक पारंपरिक औषधांमध्ये विषाचा वापर होत आल्यानंतर अनेक औषध कंपन्यांच्या औषधांमध्ये सापाच्या विषाचा वापर वाढला आहे. या विषातील एक विशिष्ट प्रकारचा घटक कर्करोगाचे मुळ मानल्या जाणाऱ्या टय़ुमरला रोखू शकत असल्याने जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये सापांच्या विविध प्रजातीच्या विषावर मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आहे. त्याच वेळी दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये उच्चभ्रूंकडून आयोजित केल्या जाणाऱ्या रेव्ह पाटर्य़ामध्ये ‘के-७२’ आणि ‘के-७६’ या नावाने सापांचे विष मादक द्रव्य म्हणून प्रचलित आहे. चरस, गांजा यासारख्या मादकद्रव्याने येणाऱ्या नशेपेक्षाही या विषाची नशा अधिक असल्यामुळे इंजेक्शनमधून काही प्रमाणात हे विष शरीरात पेरले जाते. हे विष मिळवण्यासाठी सापांची गरज असल्याने तस्कर सर्पमित्रांचा आधार घेतात. मादकद्रव्य म्हणून पाटर्य़ामध्ये होणारा वापर आणि अ‍ॅन्टीव्हेनमसाठी लागणारी विषाची गरज यामुळे लाखो रुपयांची उधळण या व्यवसायात होत असल्याने ‘ईझी मनी’ मिळतो म्हणून ९० टक्के सर्पमित्र या व्यवसायाकडे वळले आहेत.
मराठवाडय़ातील एका कृषी अधिकाऱ्याच्या मृत्यूने गुन्हेक्षेत्रातही याचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीने एका सर्पमित्राला सुपारी देऊन त्याच्याकडून पतीला कोब्रा दंश करवून घेतला. मादकद्रव्यासाठी वापरले जाणारे विष हे प्रामुख्याने कोब्रा प्रजातीच्या सापांचे असते. मुंबई हे सर्पविषाच्या तस्करीचे केंद्र असून शहरातील क्रॉफर्ड मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात हा व्यवसाय चालतो. त्यासाठी या ठिकाणी सापांचे ‘कृत्रिम प्रजनन’सुद्धा केले जाते. या आंतरराष्ट्रीय तस्करीचे मुख्यालय मुंबई असले तरीही मूळ विदर्भात आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्य़ांत नाग आणि मण्यारच नाही, तर पट्टेरी मण्यारसुद्धा सहज सापडतो. त्यामुळेच या जिल्ह्य़ांच्या सीमेवरून सापांची तस्करी मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. वनखाते मात्र हा व्यवहार रोखण्यास अपयशी ठरला आहे.

चांगले सर्पमित्र बदनाम
सापांच्या प्रजाती आणि त्यांच्या विषाची दाहकता यावरून एक ते दीड-दोन लाख रुपये प्रती मिलिग्रामसाठी मोजले जातात. ‘ईझी मनी’चा हा पर्याय असल्यामुळे अनेक सर्पमित्र याकडे वळत आहेत आणि हे वास्तव अलीकडे नागपूर आणि आसपास उघडकीस आलेल्या सापांच्या वाहतूक आणि तस्करीतून सिद्ध झाले आहे. मात्र, ९० टक्के या व्यवसायाकडे वळणाऱ्या सर्पमित्रांमुळे १० टक्के चांगले काम करणारे सर्पमित्र बदनाम होत आहेत. उघडकीस आलेल्या तस्करीच्या प्रकरणातील सर्पमित्रांची जमानतीवर होणाऱ्या सुटकेमुळे सर्पमित्रांना या व्यवसायासाठी आणखी बळ मिळाले आहे, असे सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासक पराग दांडगे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 2:22 am

Web Title: one ml snake venom worth rs 1 5 lakh
Next Stories
1 आमदार रमेश कदम राष्ट्रवादीतून निलंबित
2 कांद्याची कमानही चढती
3 शंभर पक्ष्यांचा मृत्यू; ८३ वाचविण्यात यश
Just Now!
X