संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी एक घटना पुण्यात काहीच दिवसांपूर्वी घडली. एका १४ वर्षीय मुलीवर १४ आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना होती. दरम्यान, या प्रकरणाची संबंधित आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी एका आरोपीला आता ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, या अटक आरोपीला आता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत एकूण १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

नुकताच अटक करण्यात आलेला हा आरोपी दादर येथील मध्य रेल्वेचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पोलिसांनी ठाण्यातील राहत्या घरातून अटक केली आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (परिमंडळ ५) यांनी मंगळवारी (१४ सप्टेंबर) सांगितलं आहे, “पीडित मुलगी २ सप्टेंबर रोजी दादर स्टेशनवर पोहोचली होती. तेव्हा एका कंत्राटदारासाठी काम करणारा रेल्वे कर्मचारी तिला भेटला. त्याने या पीडित मुलीला पुण्यात तिच्या घरी पोहोचण्यास मदत करू असं सांगून आमिष दाखवलं. यावेळी, तो या मुलीला ठाण्यात आपल्या भाड्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने हा गुन्हा केला. ”

नेमकं काय घडलं?

३१ ऑगस्ट रोजी पुणे स्टेशनवरून अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेली होती. तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवलं आणि नंतर थेट एका खोलीत घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यामध्ये सहा रिक्षाचालक आणि दोघे रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे, आठ आरोपींना काही तासात ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात अत्याचार झाल्यानंतर ही मुलगी दादरला गेली होती. दरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीला खोली वाटप करताना मुलीची कागदपत्रे न मागता सामूहिक बलात्काराला प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन लॉज व्यवस्थापकांना देखील यावेळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांनी बेपत्ता मुलीची तक्रार दाखल केली तेव्हा ही बाब उघडकीस आली.