लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र कायम आहे. जिल्ह्यात आणखी एक मृत्यू व १८ नव्या रुग्णांची नोंद बुधवारी झाली. आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५६८ झाली. पातूर येथील मृतक नगर परिषदेतील माजी पदाधिकारी आहे.

अकोला जिल्ह्यात करोनाचा संसर्ग सातत्यपूर्ण वाढत आहे. रुग्णांसोबतच मृत्यूचे प्रमाणात कमालीचे वाढत आहे. काही दिवस नियंत्रणात आलेले मृत्यूचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याने धोका वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण २१२ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १९४ अहवाल नकारात्मक, तर १८ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज दुपारी पातूर येथील रहिवासी एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २४ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोनामुळे पातूर येथील हा दुसरा बळी आहे.

आज दिवसभरात १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात ११ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात तीन महिला व आठ पुरुष आहेत. त्यामध्ये अकोट येथील चार जण, गवळीपूरा दोन जण तर उर्वरित मोठी उमरी, कैलास नगर, डाबकी रोड, कारागृह वसाहत व बार्शीटाकळी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी सात जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात एक महिला असून अन्य सहा पुरुष आहेत. त्यातले डाबकी रोड येथील तीन जण, तर जुने शहर, पोळा चौक, मोठी उमरी, रजपूतपुरा येथील रहिवासी प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे.

७४.२९ टक्के रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११६५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्याचे प्रमाण ७४.२९ टक्के आहे. आज दुपारनंतर १० जण कोविड केअर केंद्रामधून, तर १० जणांना शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून असे एकूण २० जणांना घरी सोडण्यात आले.
अकोल्यातील मृत्यूदर ५.०३ टक्के
जिल्ह्यामध्ये गत काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर ५.०३ टक्के झाला असून, राज्याच्या तुलनेत तो अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.