लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा बळी गेला असून, १० नवे रुग्णांची नोंद शनिवारी झाली. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान महिला रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ९२ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १८५९ झाली आहे. रुग्ण संख्या व मृत्यूदर वाढत असल्याने जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती आहे.

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. शहरीपेक्षा ग्रामीण भागात आता करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूचे प्रमाण कमालीचे वाढले. दोन दिवसाच्या खंडानंतर आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३५५ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ३४५ अहवाल नकारात्मक, तर १० अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. दरम्यान, बाळापूर येथील रहिवासी एका ६७ वर्षीय महिला रुग्णाचा ऑयकॉन रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. त्यांना ३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. आज दिवसभरात १४ जणांना सुट्टी देण्यात आली. पीकेव्ही कोविड केअर सेंटरमधून १२, सर्वोपचार रुग्णालयातून दोन जणांना सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील १४६४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज दिवसभरात १० जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळच्या अहवालातच ते दहा रुग्ण आढळून आले. त्यात दोन महिला व आठ पुरुष आहेत. यातील सहा जण अकोट येथील, दोन जण बाळापूर येथील तर उर्वरित खडकी व बोरगाव येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालात एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. ७६ अहवाल नकारात्मक आले आहेत.