लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात आणखी एक मृत्यू व १८ नव्या रुग्णांची नोंद बुधवारी झाली. आतापर्यंत ९१ जणांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १७९७ झाली. दरम्यान, आज दिवसभरात ११ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात करोनाचा प्रकोप सुरूच आहे. रुग्ण संख्या वाढीसोबतच रुग्ण दगावण्याचे प्रमाणही कमालीचे वाढले. दररोज करोनाबाधितांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. मृत्यूच्या सत्रामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. विविध उपाययोजना करूनही करोनावर नियंत्रण व मृत्यू रोखण्यात यश आलेले नाही. जिल्ह्यातील एकूण ३७० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ३५२ अहवाल नकारात्मक, तर १८ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण १३२३१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२८२१, फेरतपासणीचे १५४ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३११७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ११३४१ तर सकारात्मक अहवाल रॅपिट टेस्टचे २१ मिळून १७९७ आहेत. आज दिवसभरात शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून सात, तर कोविड केअर सेंटरमधून चार अशा ११ जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १३४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

दरम्यान, वाशीम बायपास येथील ६० वर्षीय महिलेचा उपचार घेताना आज पहाटे मृत्यू झाला. या महिला रुग्णाला ३० जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दिवसभरात १८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात सकाळी १२ रुग्ण आढळून आले. त्यात नऊ महिला व तीन पुरुष आहेत. त्यामध्ये अकोट येथील तीन जण, तेल्हारा, बोरगाव व पारस येथील प्रत्येकी दोन, तर सातव चौक, बाळापूर व वाशीम बायपास येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी सहा रुग्णांची भर पडली. त्यात चार महिला व दोन पुरुष आहेत. महान, अकोट येथील प्रत्येकी दोन तर धोत्रा मूर्तिजापूर, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

अकोल्यातील मृत्यूदर ५ टक्क्यांवर
जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर ५.०० टक्के झाला असून, राज्याच्या तुलनेत तो अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.