लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : जिल्ह्यात करोनाचा प्रकोप सुरूच असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू, तर १० नवीन रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्ण संख्या १६१७ वर पोहचली आहे. करोनातून बरे झालेल्या २२ जणांना आज सुट्टी देण्यात आली.
अकोला जिल्ह्यात करोनाचा संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. रुग्ण संख्या वाढीसोबतच रुग्ण दगावण्याचे प्रमाणही कमालीचे वाढले. दररोज करोनाबाधितांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. करोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली.

जिल्ह्यातील एकूण १८५ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १७५ अहवाल नकारात्मक, तर १० अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज पहाटे एका ६५ वर्षीय रुग्णाचा उपचार सुरू असतांना रुग्णालयात मृत्यू झाला. ते शंकरनगर येथील रहिवासी होते. त्यांना २३ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारनंतर सर्वोपचार रुग्णालयातून पाच, तर कोविड केअर केंद्रातून १७ जण अशा एकूण २२ जणांना उपचाराअंती सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १२२२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज दिवसभरात १० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज सकाळी सात जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. ते पातूर, मोठी उमरी, पारस, बुलढाणा येथील इकबाल नगर, जळगाव जामोद, बार्शिटाकळी, बाळापूर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. जळगाव जामोद येथील रुग्ण ओझोन रुग्णालयातून पाठविण्यात आलेला आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल सकारात्मक आले असून त्यात तीन पुरुष आहेत. ते तेल्हारा तालुक्यातील अडगाव, मोठी उमरी, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.

१० हजारावर अहवाल नकारात्मक
जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण ११६८८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ११३१९, फेरतपासणीचे १४९ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २२० नमुने होते. आजपर्यंत एकूण ११६३८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या १००२१, तर सकारात्मक अहवाल १६१७ आहेत.