लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनामुळे आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे. ३३ नवे करोनाबाधित रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. काल रॅपिड टेस्टमध्ये सकारात्मक आढळून आलेल्या १६ रुग्णांचीही आज नोंद करण्यात आली. इतर जिल्ह्यातील रुग्ण व मृत्यू संख्या आज जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २३३४ झाली असून, एकूण मृत्यू ९९ झाले आहेत.
जिल्ह्यात करोनाचा प्रकोप वाढतच आहे. अकोला जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या एकूण आकडेवारीत इतर जिल्ह्यातील रुग्ण व मृतांचा समावेश होता. तो वगळण्याचा आज निर्णय घेण्यात आला.

एक आत्महत्या व सात करोनाबाधितांचा मृत्यू कमी झाल्याने जिल्ह्यातील करोनाबळीची संख्या ९९ झाली. एकूण व करोनामुक्त संख्याही कमी झाली. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ११० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ३३ अहवाल नकारात्मक, तर ७७ अहवाल सकारात्मक आले आहेत. काल रात्री रॅपिड टेस्टमध्ये १६ अहवाल सकारात्मक आले. त्याचाही समावेश एकूण रुग्ण संख्येत आज करण्यात आला आहे. सध्या ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज एकाचा मृत्यू झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील बारामीखुर्द येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाला २० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रुग्णालयात ते दगावले.

आज दिवसभरात ३३ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी २२ रुग्ण आढळून आले. त्यात तीन महिला व १९ पुरुष आहेत. त्यातील १५ जण जिल्हा कारागृहातील असून, रामदासपेठ येथील तीन जण, तर अडगाव ब्रु., कुटासा, जुने शहर व खदान येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी ११ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात चार महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तीन जण महान येथील, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण तर वाडेगाव व कारागृह वसाहत येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज दुपारनंतर शासकीय वैद्याकीय महाविद्याालय येथून १०, कोविड केअर केंद्रातून २९, खासगी रुग्णालय व हॉटेल मिळून ११ असे एकूण ५० जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १९०६ जण करोनामुक्त झाले आहेत.