लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला  शहरात करोनाचा प्रकोप सुरूच आहे. शहरातील एका ६८ वर्षीय रुग्णाचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१ जणांचे मृत्यू झाले आहेत. शहरात गुरुवारी तब्बल ३३ नव्या रुग्णांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३४१ वर पोहोचली. सध्या १२९ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात करोनाचा कहर सुरूच असून, रुग्ण संख्या वाढीसोबतच मृत्यूच्या प्रमाणही सातत्याने वाढत आहे. आणखी एक मृत्यू आणि ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण १७३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १४० अहवाल नकारात्मक, तर तब्बल ३३ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३४१ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील २१ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे.

आतापर्यंत १९१ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १२९ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री शहरातील एका ६८ वर्षीय रुग्णाचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो रुग्ण भीम चौक अकोट फैल भागातील रहिवासी होता. १८ मे रोजी त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, १६ जण नवे करोनाबाधित आढळून आले. त्यामध्ये सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील तीन जण रेल्वे कॉलनी जठारपेठ, फिरदोस कॉलनी, डाबकी रोड, नायगाव येथील प्रत्येकी दोन जण, रजतपूरा, ज्योती नगर, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपीडित कॉलनी अकोट फैल व लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार, आणखी १७ करोनाबाधित रुग्ण वाढल्याने आज दिवसभरात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये सात महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये जोगळेकर प्लॉट डाबकी रोड येथील चार जण, सोनटक्के प्लॉट जुने शहर येथील तीन जण तर रेवती नगर डाबकी रोड, देशमुख फैल, डाबकी रोड, अकोट फैल, सावंतवाडी, सिव्हिल लाईन, जुने शहर, लक्कडगंज, मोमीनपूरा व आंबेडकर नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी आरोग्य तपासणी सुरू आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

आतापर्यंत १९१ जण करोनातून बरे
आतापर्यंत जिल्ह्यातील १९१ जण करोनातून बरे झाले आहेत. बुधवारी रात्री २४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील २१ जण कोविड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत, तर तिघांना घरी सोडण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागातील ते रहिवासी आहेत.

२८३३ अहवाल नकारात्मक
जिल्ह्यातून प्राथमिक तपासणीचे ३०२३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्याकीय कर्मचाऱ्यांचे १३९ असे एकूण ३२७१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३१७४ अहवाल आले आहेत. २८३३ अहवाल नकारात्मक, तर ३४१ अहवाल सकारात्मक प्राप्त झाले आहेत व ९७ अहवाल प्रलंबित आहेत.