लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. नांदुरा तालुक्यातील एका युवकाचा करोना तपासणी अहवाल आज, शुक्रवारी सकारात्मक आला. इतर ४१ अहवाल नकारात्मक आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज ४२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ४१ नकारात्मक, तर एक अहवाल सकारात्मक आला आहे. आज करोनाबाधित आढळून आलेला २१ वर्षीय तरुण नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा येथील रहिवासी आहे. जिल्ह्यात आणखी एका करोनाबाधित रुग्णाची भर पडल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या ३६ झाली आहे. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४ करोनाबाधित रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या रुग्णालयात नऊ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ११३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण ८६१ अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.