News Flash

सोलापूरात करोनामुळे आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सुरूवातीला 'सारी'ची लागण झाल्याचे झाले होते निदान

संग्रहित छायाचित्र

राज्यात करोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरूवातीला शहरात आकडा वाढण्याचे प्रमाण जास्त होते, पण आता करोनाने गावातही शिरकाव केला आहे. आज (शुक्रवारी) सोलापुरात करोनाबाधित असलेल्या एका पोलीस हवालदाराचा पहाटे मृत्यू झाला. ५० वर्षीय मृत पोलीस हवालदार हा सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत होता. करोनामुळे पोलीस कर्मचारी मृत्यू पावण्याचा हा दुसरा प्रकार आहे. त्याच्याच पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक फौजदाराचा या आधी करोनामुळे मृत्यू झाला होता. तर एका सहायक पोलीस निरीक्षकासह १६ पोलिसांना करोनाबाधा झाली होती. पहाटे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराला सुरूवातीला ‘सारी’ची लागण झाल्याचे निदान झाले होते.

सोलापूरात काय आहे परिस्थिती?

महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन असूनही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्यामुळे प्रसाराचा वेग मंदावला असला, तरी करोनाबाधित रूग्णांचा आकडा मात्र सातत्याने वाढताना दिसत आहे. सोलापुरात २८ नवे करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत, तर तिघांचा बळी गेला आहे. एकूण रूग्णसंख्या पाचशेचा आकडा पार करून ५१६ वर पोहोचली आहे. मृतांची संख्याही आता ३७ झाली आहे. मृतांमध्ये २४ पुरूष आणि १३ महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी करोनाशी संबंधित १०८ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात प्रत्येकी १४ पुरूष व महिलांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. तर तीन पुरूषांचा मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत २१८ रूग्ण करोनामुक्त झाले आहे आणि सध्या २६१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा- अकोल्यात करोनामुळे आणखी दोघांचा बळी, आठ नवे रुग्ण

त्या आधी गुरूवारी सोलापुरात करोनाबाधित १८ नव्या रूग्णांची भर पडून एकूण रूग्णसंख्या ४८८ वर पोहोचली होती. यात ३४ मृतांचा समावेश होता. आतापर्यंत झोपडपट्ट्यांमध्ये असलेला करोना विषाणूचा प्रादुर्भाव आता गावठाण भागातही होऊ लागल्याची माहिती समोर आली होती. तर त्याआधी शहरातील मध्यवर्ती गावठाण भागात करोनाशी संबंधित संशयित रूग्ण आढळून आले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार होत आहेत. पत्रा तालीम परिसरातील एका व्यक्तीला ‘सारी’ची लागण झाल्यानंतर तिला रूग्णालयात हलविले असता करोनाचाचणी घेण्यात आली. यात संबंधित व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिका आरोग्य प्रशासनाने पत्रा तालीम परिसरात औषध फवारणी केली. तसेच लगतच्या बाळीवेशीतही करोनाबाधित पुरूष आढळून आला. बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ या भागात रूग्ण सापडण्याची मालिका सुरूच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:44 pm

Web Title: one more policeman lost life due to coronavirus in solapur vjb 91
Next Stories
1 अकोल्यात करोनामुळे आणखी दोघांचा बळी, आठ नवे रुग्ण
2 करोनामुळे देहदान चळवळीला खीळ
3 भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जनतेने विचार करावा : जयंत पाटील
Just Now!
X