भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले आरोपी अरुण फरेरा यांनी आपल्याला पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान मारहाण झाल्याचा आरोप कोर्टासमोर जबाब देताना मंगळवारी केला. या मारहाणीनंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस या तिघांना मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.

यावेळी कोर्टासमोर साक्ष देताना फरेरा म्हणाले, ४ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांच्या कोठडीत चौकशी दरम्यान पोलिसांनी आपल्या ८-१० वेळा कानशिलात लगावल्या. अशा प्रकारे गंभीर मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जबाब परेरा यांनी इनकॅमेरा न्यायाधीशांसमोर नोंदवला. ४ तारखेला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा जबाब न्यायाधीशांसमोर कलम १६४नुसार नोंदविण्याची मागणी परेरा यानी केली होती. मात्र, न्यायालयाने परेरा यांचा १६४ नुसार जबाब न नोंदविता त्यांचे म्हणणे इनकॅमेरा मांडण्याची संधी दिली.

कोण आहेत अरुण फरेरा 
मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून अरूण फरेरा यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबई मानवाधिकार चळवळीतील ते महत्त्वाचे नेते मानले जातात. २००७ मध्ये फरेरा यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली होती. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी त्यांना ११ प्रकरणांमध्ये आरोपी केले होते. २०११ मध्ये पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामिनावर सुटका झाली होती. २०१६ मध्ये अरूण फरेरा यांनी सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या वकिल म्हणूनही काम करतात.