राज्यात पाणीस्थिती चिंताजनक; दुष्काळझळा वाढल्या

मुंबई : निवडणूक प्रचाराचा ज्वर चढत असतानाच दुष्काळझळा वाढू लागल्या आहेत. राज्यात धरणांतील पाणीसाठा झपाटय़ाने खालवत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र बनणार आहे.

मराठवाडय़ातील धरणांत अवघा एक टक्का पाणीसाठा असून अन्य विभागांतही पाणीपातळी धरणांचा तळ गाठू लागली आहे. उपलब्ध  पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील मनमाड शहरात २५ दिवसांतून एकदा, तर जळगाव शहरात सात, धुळ्यात पाच दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील ३८ धरणांपैकी भीमा खोऱ्यातील तब्बल नऊ, तर कृष्णा खोऱ्यातील एक धरण संपूर्ण रिकामे झाले आहे. या सर्व ३८ धरणांत सरासरी ३० टक्के पाणीसाठा आहे. विदर्भातील जलसाठय़ाची स्थिती यंदा गंभीर असून अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पाणीसाठा अतिशय कमी आहे.

उद्योग धोक्यात पाणीटंचाई असली तरी मराठवाडय़ासह राज्यभरात उद्योगांना काही प्रमाणात कपात करुन पाणी दिले जात आहे, मात्र मराठवाडय़ात मे महिन्यामध्ये उद्योगांचे पाणी थांबविण्याची चिन्हे असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मराठवाडा..

’११ मोठे प्रकल्प- पाणीसाठा एक टक्का

’७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३१ पूर्ण कोरडे

’७४९ लघु प्रकल्पांपैकी २९० प्रकल्पांत ठणठणाट

पश्चिम महाराष्ट्र..

प्रमुख धरणांतील पाणीसाठा टक्क्य़ांमध्ये : टेमघर (०), चासकमान (१७), वरसगाव (२६), भाटघर (२६.२६), मुळशी (२७), उजनी उणे (२८.९९), राधानगरी (३८.६१), गुंजवणी (३०.६५), कोयना (५१.७२), खडकवासला (५२), पवना (६१).

अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याने मृतसाठय़ातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री