अमरावती : करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या शासनाने कडक निर्बंध घातलेले असतानाही बरेच नागरिक शहरात गर्दी करताना दिसून येत आहेत, तर काही व्यापारी ही छुप्या पद्धतीने व्यवसाय करताना आढळून येत आहेत. अशा बेजबाबदार लोकांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन चाचणी करायला शुक्रवारपासून सुरुवात केली असून या चाचणीत अहवाल सकारात्मक आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे. येथील कॉटन मार्केट मार्गावर चाचणीदरम्यान एका व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला आहे.

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निर्देशावरुन करोनाचा संसर्ग रोखण्यासह करोना वाहक शोधण्यासाठी महापालिकेतर्फे शनिवारी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्यात आली.

करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही करोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अँटीजन चाचणी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतलीआहे.

या मोहिमेची गुरुवारपासून शहरात अंमलबजावणी करण्यात आली. स्वत: उपायुक्त रवी पवार यांनी रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षकांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन चाचणी केली.

कॉटन मार्केट मार्ग व चौधरी चौक ते नविन कॉटन मार्केट मार्गावर विनाकारण फिरणाऱ्यांची शनिवारी तपासणी  करण्यात आली. ६५ नागरिकांच्या चाचणी  दरम्यान, एका व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक  आढळून आला. या व्यक्तींला लगेच कोविड केअर केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  यावेळी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, डॉ.सीमा नेताम, डॉ. संदीप पाटबागे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक प्रशांत गावनेर, मनीष हडाले, प्रीती दाभाडे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.