अलिबागच्या पोलीस मुख्यालयात बुधवारी दुपारी झालेल्या दुचाकीचा स्फोट पोलिसांनेच घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या स्फोटात दोन पोलीस जखमी झाले होते. यात पोलीस हवालदार नितेश पाटील याचा मृत्यू झाला. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अलिबाग येथील पोलीस मुख्यालयातील विसावा विश्रामगृहासमोर बुधवारी दुपारी दुचाकीचा स्फोट झाला. यात श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी नितेश नामदेव पाटील आणि तर रणजीत नागे हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. स्फोटात गंभीररित्या जखमी झालेल्या नितेश पाटील याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा उजवा पायही काढावा लागला होता. पण अखेर रात्री बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलीस मुख्यालयात झालेल्या दुचाकीचा स्फोट हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. प्राथमिक तपासात स्फोटकांचा नियंत्रित वापर करून हा स्फोट घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मोबाईल कॉल्स तपासणी केली. यातून एका पोलीस कर्मचाऱ्यानेच हा स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली.
खालापूर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने हा बॉम्बस्फोट घडवून आणला. आरोपी आणि नितेश नामदेव पाटील या दोघांचेही एकाच महिला पोलीस कर्मचाऱ्याशी संबंध होते. या प्रेम त्रिकोणातून दुचाकी स्फोट घडवून नितेश पाटील याचा काटा काढण्यात आलाचे पोलीस अधीक्षक मो सुवेझ हक यांनी सांगितले. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दोघांचेही प्रेमसंबध असणाऱ्या महिलेचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करताहेत.