शहरात दहा दिवसांत सहा खून

औरंगाबाद शहरात मागील दहा दिवसांत तब्बल खुनाच्या सहा घटना घडल्या. त्यात बुधवारी रात्री एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडाची घटना शहर आणि जिल्ह्य़ाला हादरवून टाकणारी ठरली. चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत घडलेल्या या घटनेला एकतर्फी प्रेमाची किनार असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे.

अमोल भागीनाथ बोर्डे या विक्षिप्त तरुणाने एकतर्फी प्रेम करत असलेल्या तरुणीच्या आई-वडिलांसह भावाचा धारदार चाकू भोसकून खून केला. शिवाय स्वत: घराबाहेर येऊन तंबाखू चोळत अर्धा तास उभा राहिला. अमोलला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल बोर्डे याला गुरुवारी न्यायालयात उभे केले. सहाय्यक सरकारी वकील एन.ए. ताडेवार यांनी खून करण्यामागचा आरोपीचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास करण्यासाठी अमोलला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी अमोल यास सोमवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अमोल बोर्डे याने बुधवारी रात्री चौधरी कॉलनीतील त्याच्या घराजवळच राहत असलेले दिनकर भिकाजी बोराडे, त्यांची पत्नी कमलबाई व तरुण मुलगा भगवान यांचा घरात घुसून चाकूने भोसकून खून केला होता. अमोलने अत्यंत क्रूरपणे तिघांची हत्या केली होती. रक्ताचे मोठे शिंतोडे त्याच्या कपडय़ावर उडालेले होते. तशाही अवस्थेत तो बोराडे कुटुंबीयांच्या घराबाहेर तंबाखू चोळत अर्धातास उभा होता. त्याचा अवतार पाहून शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना व दिनकर बोराडे यांचा परिसरातच राहणाऱ्या दुसऱ्या मुलाला माहिती दिली. अमोल व मृत भगवान हे दोघे बालपणापासूनचे मित्र होते. त्यामुळे त्याचे बोराडे कुटुंबीयांकडे जाणे-येणे होते. मात्र विवाहित असूनही दोन मुलांसह माहेरीच राहणाऱ्या दिनकर बोराडे यांच्या मुलीवर अमोलचे एकतर्फी प्रेम होते. त्यातूनच तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. त्याचा अंदाज बोराडे कुटुंबीयांना आला होता. त्यावरूनच त्याला बोराडे कुटुंबीयांनी हाकलून दिले होते. त्या रागातूनच त्याने तिघांची हत्या केली.

बोराडे कुटुंबीय सामान्य असून मृत कुसुमबाई या व त्यांची विवाहित मुलगी दुसऱ्यांच्या घरी भांडी घासण्याचे काम करत होत्या. दिनकर बोराडे यांच्या विवाहित मुलीच्या तक्रारीवरून अमोल बोर्डेविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोलला गुरुवारी ३० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अन्य तीन खुनाच्या घटना

औरंगाबाद शहरात मंगळवारी दुपारी पडेगाव शिवारातील कासंबरी दग्र्याजवळ सय्यद जमीर सय्यद जहीर (वय २५) याला भोसकण्यात आले. रात्री त्याचा मृत्यू झाला. सय्यद शाकेर अली सय्यद नासेर अली याच्यासह अन्य दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. नशेच्या गोळ्या खरेदीच्या कारणावरून खुनाची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. १६ सप्टेंबर रोजी उद्योजक शैलेंद्र राजपूत यांचा त्यांच्या पत्नीनेच खून केला तर शेख शफीक शेख रफीक या तरुणाचा मृतदेह गोगाबाबा टेकडीवर १८ सप्टेंबर रोजी आढळून आला होता.