News Flash

अभियांत्रिकीतील एका विषयाचा अभ्यासक्रम मराठीत

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून आल्यामुळे या विषयाचा निकाल वाढेल

डॉ. वसंत आचवल

डॉ. वसंत आचवल यांचा अनोखा प्रयोग; पुस्तकाने निकालही वाढल्याचा दावा

औरंगाबाद : मातृभाषेतून शिक्षण मिळाले तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक सुधारते, असे बहुतांश शिक्षणतज्ज्ञ मानतात. पण विज्ञानासारख्या अवघड विषयातील तांत्रिकता सुबोध पद्धतीने मांडणे अवघड असते. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील तांत्रिकता सहजपणे इंग्रजीतून मराठीत आणणे हे तसे अवघड काम. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीमुळे औरंगाबादच्या प्रा. वसंत गणेश आचवल यांनी ‘स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल’ हे अभियांत्रिकीचे क्रमिक पुस्तक पहिल्यांदाच मराठीतून लिहिले आहे. ‘पदार्थबल’ या त्यांच्या पुस्तकामुळे या विषयाचा निकालही वाढल्याचे ते स्वानुभवाने सांगतात.

महाराष्ट्रात घाऊकपणे अभियांत्रिकी महाविद्यालये मंजूर झाली. त्याचे अनेक अनिष्ट परिणाम सध्या सर्वत्र दिसून येत आहे. पण जे विद्यार्थी अभियंता म्हणून उत्तीर्ण होतात, त्यांनाही बऱ्याचदा संकल्पना स्पष्ट नसतात. कारण भाषेचा अडथळा मोठा आहे. प्रा. आचवल यांनी पदार्थबल हा विषय मराठीतून शिकविण्याचे ठरवले. आवश्यक  टिपणे त्यांनी मराठीतून केली आणि अभियंता मित्राला ते दाखवले. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात मराठीतून शिकविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनात फरक जाणवू लागला. त्यांनी प्रा. आचवल यांना क्रमिक अभ्यासक्रम मराठीतून लिहिण्याची विनंती केली. साडेचार महिन्यांमध्ये हे काम प्रा. आचवल यांनी पूर्ण केले. ते म्हणाले, अभियांत्रिकीमधील काही संकल्पना मराठीत आणता येत नाही. त्या शब्दांना भाषांतरित केले नाही. या पुस्तकाला जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी प्रस्तावना लिहिली  आहे. ‘गणिती सूत्रांमुळे स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल हा विषय अनाकर्षक होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी त्या सूत्रांचा पाया असणाऱ्या वास्तव संकल्पना रेखांकित आकृत्यांमधून विस्तृतपणे उलगडून दाखवल्यामुळे विषयाची समज आणि विद्यार्थ्यांमध्ये सुस्पष्टता येण्यास या पुस्तकाची मदत होईल,’ असे नमूद केले आहे. पहिल्यांदाच अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून आल्यामुळे या विषयाचा निकाल वाढेल, असाही दावा केला जात आहे.

या विषयात सरासरी उत्तीर्णतेचे परिणाम ६० टक्क्यांच्या आसपास असते. अन्य अनेक विषयांचा पायाही या अभ्यासक्रमात दडलेला असल्यामुळे विषय समजून घेण्यासाठी अशा प्रकारे मातृभाषेचा प्रयोग अधिक योग्य ठरेल, असे सांगितले जात आहे.

* ग्रामीण भागातून अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षणाचा मोठा अडथळा होता, असे अनेक वर्षे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी केल्यानंतर डॉ. आचवल यांना जाणवत होते. सेवानिवृत्तीनंतर शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकविणाऱ्या प्रा. आचवल यांनी पदार्थबल हा विषय मराठीतून शिकविण्याचे ठरवले.

* एका पाठासाठी आवश्यक असणारी टिपणे त्यांनी मराठीतून केली आणि त्यांच्या एका अभियंता मित्राला ते दाखवले. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात मराठीतून शिकविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनात फरक जाणवू लागला.

स्ट्रेस, स्ट्रेनसारख्या तांत्रिक संकल्पना जशास तशा ठेवून विद्यार्थ्यांना सोपे जाईल, अशी मांडणी मराठीतून करणारे पुस्तक लिहिले आहे. शेवटी विद्यार्थ्यांना इंग्रजीतूनच परीक्षा द्यायची असते. त्यामुळे विषय समजेल, संकल्पना पोहोचेल अशा पद्धतीने मराठीत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पहिल्यांदाच आणला गेला आहे.

  प्रा. वसंत गणेश आचवल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 3:59 am

Web Title: one subject in marathi in engineering courses
Next Stories
1 राज्यातील शैक्षणिक उणिवांवर केंद्राचे बोट!
2 औरंगाबाद: भाजपा नेत्याची गाडी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली, चालकाला मारहाण
3 औरंगाबाद: वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण
Just Now!
X