अपुऱ्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला यंदा चांगलाच दणका दिला असून, जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल सुमारे एक हजार मिलीमीटर कमी पाऊस पडला आहे. दीर्घकालीन नोंदींच्या आधारे काढण्यात आलेली जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३३६४ मिलीमीटर आहे. या सरासरीपेक्षा दरवर्षी सुमारे ५०० ते ७०० मिलीमीटर जास्तच पाऊस पडतो, असा अनुभव आहे. यंदा मात्र पावसाळा संपत आल्याचे अधिकृतपणे जाहीर केले जात असताना संपूर्ण मोसमामध्ये मिळून जिल्ह्यातील पावसाची सोमवारअखेर एकूण सरासरी २१७९ मिलीमीटरवरच थबकली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात कुठेही पाऊस पडलेला नाही. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ३३७१ मिलीमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी चिपळूण तालुक्यात यंदाच्या मोसमात सर्वात जास्त पाऊस २५७२ मिलीमीटर पडला असून, त्याखालोखाल लांजा आणि मंडणगड या दोन तालुक्यांमध्ये प्रत्येकी सुमारे २४०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात यंदा एकूण सुमारे २२८४ मिमी पाऊस पडला असून गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांनी दोन हजाराचा टप्पा कसाबसा गाठला आहे. यापैकी संगमेश्वर हा जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाचा तालुका मानला जातो. दापोली आणि राजापूर हे दोन तालुके यंदाच्या मोसमात सर्वात कमी पावसाचे, अनुक्रमे १९५१ आणि १९०० मिलीमीटर ठरले आहेत. यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात पडलेल्या धुवांधार पावसामुळे त्या महिन्याची सरासरी गाठली जाऊन महिनाअखेपर्यंत एकूण सरासरी सुमारे एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली, पण त्यानंतर पावसाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये मिळून आणखी जेमतेम हजार मिलीमीटरची भर पडली आणि तेथेच यंदाच्या तुटीच्या पावसाचे चित्र स्पष्ट झाले. या अतिशय विस्कळीत आणि अपुऱ्या पावसाचा कोकणी माणसाची उपजीविका अवलंबून असलेल्या भातपिकाच्या उत्पादनाला चांगलाच फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल-मेमध्ये जाणवणारी पाण्याची टंचाई फेब्रुवारीपासूनच तीव्र होऊ लागेल, अशी भीती आहे.