27 October 2020

News Flash

दोन-तीन आठवडय़ांच्या प्रतीक्षेनंतर एक वेळ पाणीपुरवठा!

गेल्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात वार्षिक सरासरीच्या फक्त ५६ टक्केच पाऊस झाला.

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांना दोन-तीन आठवडय़ांतून एकदा पुरविण्यात येणाऱ्या पाण्यातून तहान भागवावी लागत आहे.

प्रदीप नणंदकर, लातूर

तीन वर्षांपूर्वी मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यानंतर लातूरमधील जलसंकटाची तीव्रता अधोरेखित झाली. त्यानंतर सलग दोन वर्षे चांगला पाऊस झाला. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने लातूर भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहे. शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांना दोन-तीन आठवडय़ांतून एकदा पुरविण्यात येणाऱ्या पाण्यातून तहान भागवावी लागत आहे.

गेल्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात वार्षिक सरासरीच्या फक्त ५६ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. लातूर शहरानंतर जिल्हय़ातील सर्वात मोठे शहर म्हणजे उदगीर. दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या शहरात नगरपालिका १५ दिवसांतून एकदा पाणी देण्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात २० ते २१ दिवसांनंतर एकदा पाणी मिळत असल्याचे नागेंद्र साबणे या शिक्षकाने सांगितले.

अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या सुमारे ७० हजारांच्या आसपास. वर्षभरापासून तेथील नागरिकांना २० दिवसांतून एकदा पाणी मिळते. औसाची स्थितीही तशीच आहे. ५० हजारांची लोकसंख्या असलेल्या या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तावरजा प्रकल्पातील पाणीसाठा फेब्रुवारीतच संपला. प्रकल्पाच्या पात्रात चर खणून त्यातून पाणी घेतले जाते. शहरवासीयांना २० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी तहसीलदारांकडे केली आहे. लातूर तालुक्यातील मुरुड हे ५० हजार लोकवस्तीचे गाव. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रायगव्हाण प्रकल्पातील पाणीसाठा संपल्यामुळे लातूर शहराला पाणी पुरवणाऱ्या मांजरा धरणातून काही प्रमाणात पाणी घेतले जाते. मात्र, आठवडय़ातून एकदा केवळ ४० मिनिटे पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.

औसा तालुक्यातील किल्लारीला २० ते २२ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. माकणी धरणातून पाणीपुरवठा होत असला तरी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक निळकंठ गारठे यांनी सांगितले. औसा तालुक्यातील उजनी हे २० हजार लोकवस्तीचे गाव. नदीकाठी वसलेल्या या गावाला दोन महिन्यांपासून नळाद्वारे पाणी मिळत नाही. नदीकाठचे गाव असूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची खंत सुधीर गंगणे यांनी व्यक्त केली.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी हे नदीकाठी वसलेले गाव. मात्र नदीचे पात्र कोरडे पडले असून, ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या विंधन विहिरींमार्फत पाणी विविध भागांतील सिमेंट टाक्यांत ओतले जाते व तेथे रांगा लावून पाणी घ्यावे लागते. आणखी दीड महिना कसा काढायचा, अशी चिंता शेतकरी विलास बोंडगे यांनी व्यक्त केली.

निलंगा तालुक्यातील निटूर गावातील सर्व जलस्रोत आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहीर अधिग्रहण व टँकरची मागणी करूनही प्रशासन फारसा प्रतिसाद देत नसल्याची खंत गावचे सरपंच परमेश्वर हासबे यांनी व्यक्त केली. डोंगरगाव बंधाऱ्यात अडवलेले पाणी २०१६ साली लातूरवासीयांना दिले गेले. यंदा पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करावे, असे पत्र चार महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी ते पाणी वापरले व आता प्यायला पाणी शिल्लक नसल्याचे हासबे म्हणाले.

जिल्हय़ातील दहाही तालुक्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. लातूर तालुक्यातील पाखरसांगवी जुन्या व नव्या वस्तीची लोकसंख्या १२ हजारांपेक्षा अधिक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नळाने पाणीपुरवठा बंद आहे. टँकरने प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी वितरित केले जाते. लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ या १० हजार लोकवस्तीच्या गावात गेल्या पाच वर्षांपासून नळाने पाणीपुरवठा होत नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या िवधन विहिरीचे पाणी चौकातील सिमेंटच्या टाकीत ओतले जाते व तेथून लोकांना पाणी घेऊन जावे लागते. सध्या दररोज दोन टँकरने प्रत्येक घरी २०० लिटर पाणी वितरित केले जात आहे. आजूबाजूच्या गावांत पाणी शोधत फिरण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी किशोर कुलकर्णी यांनी सांगितले.

रेणापूर, पानगाव या मोठय़ा गावांसह तालुक्यातील सर्वच गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड भेडसावतो आहे. या वर्षी सर्वात कमी पाऊस जळकोट तालुक्यात झाला. त्यामुळे तालुक्यातील ४७ गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. प्रत्येक गावात पाणी विकत घेण्याची वेळ आहे. पैसे द्यायला तयार असले तरी पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न आहे. ज्यांची आर्थिक कुवत नाही अशा मंडळींनी पाणी प्यायचे की तडफडून मरायचे? असा सवाल जळकोट येथील अजीज मोमीन यांनी केला.

जिल्हाभरात चाराटंचाई कुठेही नाही. आणखी चार महिने पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जातो. ५ लाख ६६ हजार ५८२ मेट्रिक टन इतके सर्व प्रकारच्या चाऱ्याचे उत्पादन झाले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले. सध्या हिरव्या वैरणीच्या पेंडीचा भाव ३० रुपये आहे. आतापर्यंतचा चाऱ्याचा हा सर्वाधिक भाव आहे.

पाणीविक्री तेजीत

लातूर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असली तरी ज्यांच्या शेतात मुबलक पाणी आहे, अशी मंडळी बैलगाडीमध्ये पिंप घेऊन पाणीविक्रीचा व्यवसाय करत आहेत. तालुका व मोठय़ा गावांबरोबरच आता ग्रामीण भागांतही पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. पिण्यासाठीचे पाणी विकत घेण्याचे प्रमाण आता ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पिण्यासाठीच्या पाण्याबरोबरच दैनंदिन वापराचे पाणीही विकत घ्यावे लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 3:37 am

Web Title: one time water supply in two to three weeks in latur
Next Stories
1 कृषी कर्जाच्या पुरवठय़ावर मर्यादा!
2 राजापूरची गंगा पाच महिन्यांत पुन्हा अवतरली
3 आणि ‘गळ’बंदीच्या लढय़ाला सार्थकतेची किनार!
Just Now!
X