वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या समस्यांचे निराकरण करण्यासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यात ‘एक गाव, एक दिवस’ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शहरी भागासह गाव पातळीवर वीज यंत्रणेच्या विविध समस्या निर्माण होत असतात. अनेक वेळा त्या सोडविण्यासाठी दिरंगाई होते. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी विशेष उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अकोला परिमंडळात ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तार सरळ करणे, स्पेसर्स बसविणे, वीज पुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्याा तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्युशन डब्याची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, खराब झालेले वीज खांब बदलणे, वाकलेले खांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक तार बदलणे आदी कामांचा समावेश आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे संक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र नसलेल्या गावांमध्ये ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी तिन्ही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंत्यांना दिल्या आहेत. या उपक्रमात विजेच्या समस्या दिवसभरातच मार्गी लावण्यासाठी अधीक्षक अभियंत्यांसह सर्व कार्यकारी अभियंते प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
ग्राहकांच्या तक्रारी दूर होणार
या उपक्रमांतर्गत ग्राहकांचे सदोष व नादुरुस्त वीज मीटर बदलणे, वीज बिलांची दुरुस्ती, वीज मीटरची तपासणी, नावात बदल करणे आदी प्रकारची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आपल्या गावातच दूर होणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 9:37 pm