दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

‘एक गाव एक पोलीस’ योजनेमुळे कायदा व सुव्यवस्था सक्षम होईल, असे प्रतिपादन गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. सिंधुदुर्ग पोलीस दलाने आज सुरू केलेल्या ‘एक गाव एक पोलीस’ तपास यंत्रणेस सहकार्य करणाऱ्या सर्व सुविधांसह युक्त मोटारसायकल नाइट, बॅटन, कॅमेरे आदी योजनांच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

‘एक गाव एक पोलीस,’ आय बाइक योजना, बॉडी वॉर्न कॅमेरा व नाइट बॅटन प्रदान सोहळा आज येथील नवीन नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल उपस्थित होते.

‘एक गाव एक पोलीस’ ही योजना राज्यात प्रथम औरंगाबादनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुरू करण्यात आली आहे, असे सांगून ते म्हणाले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांशी समन्वय ठेवून कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होईल.

महाराष्ट्र पोलिसांमध्ये जो संयम आहे तो भारतात कोठेही नाही. तसेच तळागाळातील सर्वसामान्यनागरिकांना पोलिसांबद्दल विश्वास वाटण्याचे काम या योजनेमुळे होईल. आय. टी. क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. जर पोलिसांचा यांच्याशी संपर्क असेल तर या प्रवृत्तीलाही आळा बसू शकेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गातील दोन उपविभागामध्ये प्रत्येकी दोन ई-बाइक आज देण्यात आल्या आहेत. गुन्हा घडल्यावर तेथे पोहोचून तातडीने पुरावे उपलब्ध करण्यासाठी उपायुक्त या ई-बाइक प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी असाव्यात म्हणून आ चार ई-बाइकच्या प्रस्तावही पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. तसेच वाहतूक पोलिसांना ५५ हजार रुपयांच्या बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रस्तावही वैशिष्टय़पूर्ण योजनेतून मंजूर करण्यात येईल, असे सांगितले. पोलिसांचे स्वत:च्या मालकीचे घर व्हावे व सीसीटीव्ही यासाठी जिल्हा नियोजन निधीतून १० टक्के ठेवण्याचे धोरण आहे. प्रत्येक तालुका पोलीस स्टेशनच्या जवळ पोलीस हॉस्टेल असावेत. येथे जीम, लाँड्री, उपहाराची सुविधा असेल. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या पाल्यांना या सुविधेचा लाभ मिळेल, असा आठही तालुक्यांचा प्रस्ताव देण्याचेही पालकमंत्री यांनी या वेळी सूचित केले. सिंधुदुर्गातील शिरोडा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक विदेशी नागरिक पर्यटनाला येतात. सिंधुदुर्गातील अन्य पर्यटनस्थळांवरही असे होणे अपेक्षित आहे. म्हणूनच टुरिझम पोलीस ही संकल्पनाही राबविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, या उपक्रमामुळे नागरिक व पोलिसांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल, तसेच विविध नवीन तंत्रज्ञानामुळे पोलीस सक्षम होतील. नागरिकांनाही दहशत, भय व गुन्ह्य़ांपासून मुक्तता मिळू शकेल. प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी ‘एक गाव एक पोलीस’, आय बाईक, बॉडी वॉर्न कॅमेरा व नाइट बॅटन उपकरणांची परिपूर्ण माहिती दिली.

या वेळी सागरी सुरक्षा व दहशतवादी कारवायांबाबत नागरिकांनी घ्यायची दक्षता या संदर्भात दोन लघुफिती दाखविण्यात आल्या. प्रारंभी मा. पालकमंत्री यांच्या हस्ते चार ई-बाइक ना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी केले. कार्यक्रमासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.