रोह्य़ातील धाटाव औद्योगिक वसाहतीत झालेल्या वायुगळतीप्रकरणी कंपनी प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीत रासायनिक प्रक्रियेदरम्यान झालेल्या वायुगळतीत एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर तिघांची प्रकृती खालावली होती.
गुरुवारी सकाळी हा अपघात झाला होता. एक्सेल कंपनीत इफ्लुअंट ट्रीटमेंट प्लांटकडे जाणाऱ्या सांडपाणी वाहिनीचे काम यशवंत सखाराम जाधव, विकास काळे, नितीन तोडकर, रमेश साळवी हे करीत असताना विषारी वायूची गळती झाली. या घातक वायूची तीव्र बाधा या सर्वाना झाली. यामध्ये यशवंत जाधव हे प्रचंड गुदमरले आणि त्यांचा जागीच अंत झाला. तर विकास काळे, नितीन तोडकर आणि रमेश साळवी मोठय़ा प्रमाणात जखमी झाले. त्यांना त्वरित रोह्य़ात जाधव नìसगमध्ये आणण्यात आले. दरम्यान, कंपनीत रासायनिक प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या घातक वायूला निष्क्रिय करण्याची कोणतीही व्यवस्था कंपनीत नसल्याचे या अपघातामुळे समोर आले. वायुगळती झाल्याची सूचना देणारे इंडिकेटरही कंपनीत बसवण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. हा निष्काळजीपणा लक्षात कंपनी प्रशासनाविरोधात रोहा पोलीस ठाण्यात (भादवि कलम ३०४, २८७ अन्वये) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. डी. कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत.