शंभरी पार केलेला कांदा पिंपरीत ८० पैसे प्रति किलो विकण्यात येत होता. निमित्त होतं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं.  आज पिंपरीत ८० पैश्यांच्या मोबदल्यात १ किलो कांदा महिलांना मिळाला. कांदा घेण्यासाठी गृहिणींच्या रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रासह देशभरात आज शरद पवार यांच्या वाढदिवस त्यांचे स्नेही आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. पिंपरी-चिंचवड शहरात देखील शरद पवार यांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीमंत जगताप यांनी अनोखी शक्कल लढवत शंभरी पार केलेला कांदा अवघ्या ८० पैशात १ किलो कांदा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे कांदा विकत घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती. कांदा विकत घेण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान बुधवार पासून कांदा प्रति किलो शंभरीच्या आत आला असला तरी देखील तो सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याची ओरड आहे. एरवी कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला पाहायला मिळतो. मात्र, कांद्याचे दर गगनाला भिडल्यानंतर तो महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणतो आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या अनोख्या आणि उपयोगी उपक्रमा बाबत महिलांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. भाव वाढल्याने अनेक दिवसांपासून नागरिक कांद्याकडे पाहात देखील नव्हते. आज मात्र प्रत्येक कुटुंबाला अवघ्या ८० पैशात १ किलो कांदा देण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्रीमंत जगताप यांनी केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला आहे. या उपक्रमाचे कौतुक अवघ्या पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे.