05 June 2020

News Flash

नाशिकमध्ये कांदा, तर जळगावमध्ये केळी उत्पादक रस्त्यावर

केळी उत्पादकांनी जळगाव जिल्ह्य़ातील धानोरा येथे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले.

कांदा व केळीचे भाव घसरत असल्याने मंगळवारी संतप्त कांदा उत्पादकांनी नाशिक जिल्ह्य़ातील उमराणे, कळवण तसेच बागलाण तालुक्यांत, तर केळी उत्पादकांनी जळगाव जिल्ह्य़ातील धानोरा येथे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले.
लाल कांद्याच्या आवक वाढू लागताच नाशिक जिल्ह्य़ात कांद्याचे भाव घसरण्यास सुरूवात झाली. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी सरासरी प्रति क्विटंल ११०० रूपयांपर्यंत भाव खाली आले. जिल्ह्य़ातील इतर बाजार समित्यांमध्येही हीच स्थिती होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली उमराणे येथे मुंबई-आग्रा महामार्ग तसेच बागलाण तालुक्यात कांदा उत्पादकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कळवण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा निर्यात शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी सुमारे पाऊण तास ‘रास्ता रोको’ करण्यात आला. तहसीलदार अनिल पुरे यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जळगावमध्ये चोपडा तालुक्यात धानोरा येथे अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर शेतकऱ्यांनी ‘केळी फेको’ आंदोलन करीत तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली. ‘कृषिमंत्री एकनाथ खडसे हे जळगावचे असूनही शेतकऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही. खा. रक्षा खडसे यांनीही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच शेतीमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करावे लागले,’ अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. काही दिवसांपासून केळीचे भाव सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी केळीची कापणी व खरेदीस नकार दिल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी एकही राजकीय व शासकीय प्रतिनिधी पुढे न आल्याच्या निषेधार्थ जळगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले.
केळीला किमान एक हजार रूपये भाव द्यावा, गेल्या वर्षांचा केळी पीक विम्याचा त्वरीत लाभ मिळावा, या वर्षांचा पीक विमा काढावा, कापसाला प्रति क्विंटल किमान सहा हजार रूपये भाव द्यावा, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 12:36 am

Web Title: onion and banana traders agitation on road
टॅग Onion
Next Stories
1 बाबासाहेबांचे गाव ‘आदर्श’ होणार – खा. अमर साबळे
2 आत्महत्यांप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करा – नारायण राणे
3 म्हसळा तालुक्यात डेंग्यूसदृश तापाची साथ
Just Now!
X