भाववाढीमुळे ग्राहकांच्या ताटात कांदा नाही; रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचाही कांदा देण्यास नकार

बाजारपेठेतील कांद्याची आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वसई-विरारमधील उपाहारगृहे आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांना कांदा देण्यास नकार दिला आहे. भाववाढीमुळे ग्राहकांच्या ताटात कांदा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ८० ते १०० रुपये प्रतिकिलो झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना पार्सल आणि टेबलावर देण्यात येणारा कांदा बंद केला आहे. जेवणाबरोबर कांदा मिळत नसल्याने खवय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जेवणासोबत कांदा देणे परवडत नसल्याने अनेक उपाहारगृह चालकांनी सांगितले. त्यामुळे अनेक उपाहारगृहांनी आता काकडी आणि मुळ्याचा आधार घेतला आहे.

कांद्याच्या भाववाढीमुळे लहान खाद्यपदार्थ विक्रेते तर अडचणीत सापडले आहेत. अंडाभुर्जी, कांदा भजी, मिसळ यांसारख्या पदार्थावरही कांद्याच्या भाववाढीचा परिणाम झाला आहे. कांदा परवडत नसल्याने आणि संपूर्ण व्यवसाय कांद्यावर अवलंबून असल्याने अनेक लहान खाद्यविक्रेत्यांनी आपल्या गाडय़ा बंद ठेवल्या आहेत. कांदा देता येत नसल्याने ग्राहकांची संख्या कमी होत असून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे शैलेश पावसकर या खाद्यविक्रेत्याने सांगितले.

जेवणाबरोबर आणि पार्सलसोबत कांदा दिला जातो. दिवसाला २० ते ३० किलो कांदा त्यासाठी लागतो. आता कांद्याचे भाव १०० रुपये किलो झाल्याने परवडत नाही. त्यामुळे आता काकडी, मुळा किंवा गाजर ग्राहकांना देत आहोत.

– विनोद सोनावणे, हॉटेल व्यावसायिक