News Flash

कांदा निर्यातबंदीचा पाच हजार कोटींना फटका?

नाशिक, पुणे, नगरमध्ये मोठय़ा प्रमाणावर कांदा शिल्लक

संग्रहित छायाचित्र

नाशिक, पुणे, नगरमध्ये मोठय़ा प्रमाणावर कांदा शिल्लक

अशोक तुपे, लोकसत्ता

श्रीरामपूर : कांदा निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी मोठय़ा प्रमाणावर कांदा चाळीत शिल्लक असलेल्या नाशिक, नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्य़ांमधील शेतकऱ्यांचे  नुकसान झाले आहे.

कांदा निर्यातबंदीचा केंद्राने घेतलेला निर्णय अनाकलनीय असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चीन व पाकिस्तानला त्याचा फायदा होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पाच हजार कोटींचा फटका बसेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून वगळला. त्यामुळे आता ‘एक देश एक बाजारपेठ’ या धोरणानुसार मुक्त बाजारपेठेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, असे आडाखे होते; पण अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला.

बाजारात बटाटे ४० ते ५० रुपये, गवार १०० रुपये, कोथिंबीर १०० ते १५० रुपये, टोमॅटो ८० रुपय, वाटाणा ८० ते १०० रुपये, वांगी ५० ते ६० रुपये, लसूण २०० रुपये किलो झाले आहेत. सलग तीन महिने पाऊस असल्याने भाजीपाल्याचे दर भडकले. त्या तुलनेत कांद्याचे दर कमी होते. कांद्याचे दर हे तुलनेत खूप कमी म्हणजे २५ ते ३० रुपये किलो होते. यापूर्वी कांदा ५० ते साठ रुपयांच्या वर गेला तर निर्यात कमी करण्याकरिता प्रथम निर्यातमूल्य वाढविले जात असे. तरीदेखील दरवाढ रोखली गेली नाही तर निर्यातबंदी केली जात होती; पण सरकारने अचानक निर्यातबंदीचा धक्का दिला.

फेब्रुवारी महिन्यापासून ऑगस्टअखेरीपर्यंत कांदा सरासरी ८०० रुपये क्विंटल दराने विकला. मागील वर्षी परतीच्या पावसाने नुकसान झाले. विक्रमी क्षेत्रात लागवड होऊनही उत्पादन घटले. लागवड केलेला कांदा सडला. राज्यात हे चित्र होते. मागील पंधरा दिवसांपासून दरवाढ सुरू झाली. तरीही यापूर्वी झालेले नुकसान भरून निघाले नव्हते.

करोनामुळे सुरुवातीला कांदा निर्यात करताना अडचणी आल्या; पण नंतर निर्यात सुरळीत सुरू झाली. गेल्या आठ महिन्यांत सोळा ते सतरा लाख टन कांदा निर्यात झाला. महिन्याला सरासरी सवा तीन लाख टन कांदा निर्यात झाला. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत पावणेसात लाख टन कांदा निर्यात झाला. मागील वर्षी सव्वा अकरा लाख टन कांदा निर्यात झाला होता, तर दोन वर्षांपूर्वी साडेएकवीस लाख टन कांदा निर्यात झाला होता. जागतिक बाजारपेठेत भारताच्या कांद्याचा दर्जा पहिल्या क्रमांकाचा आहे. त्यामुळे चीन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान आदी देशांत कांदा चांगला पिकत असला तरी त्याला मागणी नसते. भारताचा कांदा तिखट असतो. त्याचा आकार, रंग, चव यांची गोडी जगाला लागली आहे.

भारताच्या कांद्याला जगात मागणी आहे. आपली निर्यात बंद असेल तर चीन, इजिप्त, पाकिस्तान व अफगाणिस्तान यांचा कांदा विकतो; पण सरकारने कांदा निर्यातीचे धोरण निश्चित केले पाहिजे. अचानक बंदी केल्याने मुंबईत बंदरात कांद्याचे ४०० कंटेनर उभे आहेत. मुंबईच्या हवामानात हा कांदा साडेल. बांगलादेश सीमेवर ३३ मोटारगाडय़ा उभ्या आहेत. त्याला निर्यातीला परवानगी दिली नाही तर निर्यातदारांचे शंभर कोटींचे नुकसान होईल.

– अजित शहा, अध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना

सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात कांदा निर्यातीतून देशाला डॉलर मिळत होते. एक संधी होती; पण ती सोडली. हा मूर्खपणाचा निर्णय आहे. त्यामुळे चीन व पाकिस्तानला फायदा होईल.

 रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

उत्पादन खर्च निघेल एवढा भाव मिळू लागल्यानंतर तत्काळ निर्यातबंदी लादली गेली. त्याने शेतकऱ्यांचा तोटा होईल; पण ग्राहकांनाही फायदा होणार नाही.

– दीपक चव्हाण, शेतीमालाचे अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 2:32 am

Web Title: onion export ban hits rs 5000 crore zws 70
Next Stories
1 आमदारांसाठी विशेषाधिकाराचा वापर
2 रत्नागिरीत दोन दिवसांत आठजणांचा करोनाने मृत्यू
3 Coronavirus : विदर्भात करोनाचे ४१ बळी
Just Now!
X