कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झालेली असताना सध्या शेतकरी जास्तीत जास्त क्षेत्र कांदा लागवडीखाली आणण्याच्या तयारीत आहेत. सध्या कांद्याच्या बियाण्याला बाजारात मोठी मागणी आहे. परंतू बियाणे मिळणे शेतकऱ्यांसाठी दुरापास्त झाले आहे. पावसामुळे रोपं वाया गेल्याने नव्याने रोपं तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना आता शिकस्त करावी लागत आहे. कांदा लागवडीसाठी रोपांचे भाव वाढल्याने साताऱ्यात रोपं मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपांची उगवणच झालेली नाही. बियाणं व रोपं वाया गेल्यामुळे साताऱ्यातील बाजारात कांदयाचे बी आणि रोपांचा तुटवडा आहे. मिळालेल्या संधीचा फायदा घेत ज्यांच्याकडे बियाणं व रोपं आहे ते चढ्या भावाने विक्री करत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झालं आहे. अखेरीस नाईलाज म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाहेरुन रोपं आणण्याला पसंती दर्शवली आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. सुरुवातीला शेतकऱ्यांनी कांदा रोपांसाठी स्वतःजवळ ठेवणीतील बियाणे वापरले. मात्र मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणी रोपांची उगवण झाली नाही. अनेक ठिकाणी उगवून आलेली रोपे बुंध्यातच सडून गेली. अवकाळी पाऊस, वातावरण बदलातून लागवडी योग्य टीकलेल्या रोपांच्या पातीला पीळ पडण्याचे प्रकार झाल्याने रोपांनी वाफ्यातच माना टाकल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मिळेल त्या दरात मिळेल त्या ठिकाणावरून कांदा बियाणे व रोपे मिळवण्यासाठी शिकस्त करत आहेत.

कांद्याचे वाढलेले दर, पावसाने व वातावरणातील बदल यामुळे रोपांची झालेली नासाडी याचा परिणाम बियाण्याच्या दरवाढीवर झाला आहे. सध्या कांद्याच्या बियाण्याचा दर साडेतीन ते पाच हजार रुपये झाला आहे. या दरातही बियाणं मिळेल याची खात्री नाहीये. अनेक शेतकरी बियाण्याच्या शोधात नगर, पुणे, नाशिक, बारामती, सोलापूर या भागात जाऊन बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांच्याकडे बियाणे व रोपे शिल्लक आहेत त्यांनी मनमानी भावात रोपे विकण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रकारात अतिशय गरजू शेतकरी नाडला जात आहे.