देशामध्ये सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न घेणारा भाग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये एक शेतकऱ्याने स्वत:ला कांद्यामध्ये गाडून घेतले. कांद्याला अतीअल्प भाव मिळत असल्याने निराश झालेल्या मारुती मुंढे या शेतकऱ्याने स्वतःला कांद्याच्या ढिगाऱ्यात गाडून घेतलं आहे. सरकार आपल्या मागण्या मान्य करेपर्यंत आपण कांद्याच्या ढिगाऱ्यात बसून आमरण उपोषण करणार असल्याचे मारुती यांनी स्पष्ट केले आहे.

मारुती हे येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथील रहिवाशी आहेत. त्याच्या शेतामध्ये कांद्याचे भरघोस उत्पन्न आले असले तरी कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्याने इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे तेही हवालदिल झाले आहेत. मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याचा भावात सतत घसरणच होत आहे. त्यामुळेच भरघोस उत्पन्न घेऊनही निराश झालेल्या मारुती यांनी कांद्याला भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र केवळ उपोषणाला न बसताना त्यांनी स्वत:ला गळ्यापर्यंत कांद्याच्या ढिगात गाडून घेत उपोषण सुरु केले आहे.

सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीबरोबरच शेतकऱ्यांचे २०१८ पर्यंतचे सर्व कर्ज माफ करावं अशी मागणी मारुती यांनी केली आहे. याचबरोबर २०१९ पर्यंत शेतकऱ्यांची सर्व वीज बिले माफ करण्यात यावीत असंही मारुती यांच म्हणणं आहे. जोपर्यंत शासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी हे आमरण उपोषण सुरु ठेवणार असल्याचे मारुती यांनी सांगितले आहे.

मागील अनेक महिन्यांपासून कांद्याच्या दरावरुन नाशिक आणि परिसरातले शेतकरी सरकारकडे हमीभाव देण्याची मागणी करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पंतप्रधान मोदींना कांदा विक्रितून मिळालेले पैसे पाठवून कांद्याच्या दराचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. तरीही केवळ आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने मारुती यांच्यासारखे कांदा उत्पादक शेतकरी आगळ्यावेगळ्या पद्धतीने उपोषण करुन कांदा दराच्या प्रश्नावर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी करताना दिसत आहेत.