News Flash

आता उत्पादकांना रडवतो आहे कांदा! मातीमोल भावात विक्री

मातीमोल भावात विक्री करण्याची वेळ; उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी विवंचनेत

संग्रहित छायाचित्र

प्रबोध देशपांडे

अकोला : काही महिन्यांपूर्वी विक्रमी किमतीने भाव खाऊन जाणाऱ्या कांद्याने आता चक्क उत्पादकांच्या डोळ्यातच पाणी आणले. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह विविध कारणांमुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. व्यापाऱ्यांना मातीमोल भावात कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. कांद्याचे अर्थचक्र अधांतरी झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पश्चिम विदर्भातील विविध भागात शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामामध्ये कांद्याची लागवड केली. शेतकऱ्यांनी मेहनत करत घाम गाळून कांद्याचे उत्पादनही चांगले घेतले. कांद्याचे पीक काढण्यासाठी तयार झाले असतांनाच करोनाचे विश्वाव्यापी संकट कोसळले. करोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून टाळेबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली. यातून शेती कामे वगळली असली तरी त्याचा विपरित परिणाम पडला. कांदा काढण्यासाठी वेळेत मजूर मिळाले नाहीत. जे मजूर कामावर आले, त्यांनी दुप्पट-तिप्पट मजुरी घेतली. अथक परिश्रमाने कांदा घरात आला. त्यानंतर तो विक्रीला काढला असता व्यापारी खरेदी करण्यास फारसे उत्सुक नव्हते. काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात कांद्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कांदा पडून आहे.

टाळेबंदीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी ग्राहकांकडे घरपोच कांदा विक्रीचा प्रयोग केला. मात्र, तोही फारसा यशस्वी ठरला नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची क्षमता नाही. काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना अत्यल्प भावात कांदा देण्याऐवजी स्वत: रस्त्यावर ट्रॅक्टर लावून कांदे विक्री केला. ४०-५० किलोच्या कट्ट्यांमधून थेट ग्राहकांना दिले. मात्र, ग्राहकही पडलेल्या भावाने मागणी करीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही कांद्याला जबर फटका बसला आहे. पाणी लागलेला कांदा जास्त दिवस टिकत नाही. सध्या व्यापारी चांगल्या दर्जाचा कांदा चार ते पाच रुपये किलो दराने मागत आहे. त्यामध्येही चाळणी लावून हलक्या दर्जाचा कांदा घेण्यास व्यापारी नकार देतात. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत.

कांद्याची विक्री करावी कशी?
आधीच नैसर्गिक आपत्तीने शेतकरी खचलेला आहे. खरीपातील विविध पिकांची नुकसान भरपाई निघण्यासाठी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. पुन्हा नैसर्गिक आपत्ती आल्याने दोन-तीन वेळा कांद्यावे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीतही काढलेला कांद्याची टाळेबंदीच्या काळात विक्री करावी कशी? असा प्रश्न उभा ठाकला. कांदा सडण्याचे प्रमाण वाढून तो फेकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शासनाकडून मदतीची मागणी होत आहे.

टाळेबंदीमुळे मागणी घसरली
पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्य व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. सर्वच कालावधीत कांद्याला चांगली मागणी असते. करोनामुळे गत दोन महिन्यांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात हॉटेलसह सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी, कांद्याची मागणी रोडावली आहे. उत्पादन जास्त व मागणी कमी असल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
कोट

अत्यल्प भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. टाळेबंदीमुळे कांदाला मागणी नाही. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
– डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 9:54 pm

Web Title: onion have no rates due corona virus and lockdown farmers tension increasing scj 81
Next Stories
1 गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची भरती प्रक्रिया होणारच; कुलगुरूंचा स्थगितीला स्पष्ट नकार
2 अकोल्यात आणखी दोघांचा करोनामुळे मृत्यू, रुग्णसंख्या ३५५
3 सोलापुरात करोनाचे सहा बळी, पोलीस हवालदाराचाही मृत्यू
Just Now!
X