कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. सरकारचे नाक दाबले तरच तोंड उघडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने जेल भरोसारखे आंदोलन करावे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. कांद्याला २ हजार रुपये क्विंटल दर मिळाला म्हणून कांदा उत्पादक संघटनेचे धनंजय धोर्डे यांच्या नेतृत्वाखाली राहाता, राहुरी, वैजापूर, येवला, श्रीरामपूर, लासलगाव आदी बाजार समित्यांमध्ये संप करण्यात आला होता. कांदा उत्पादकांनी चार दिवस कांदा विक्रीसाठी नेला नाही. आंदोलन करूनही सरकारने त्यात लक्ष घातले नाही. त्यामुळे धोर्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली.
या वेळी त्यांच्या समवेत विनायक गाढे, दिगंबर तुरकणे, राजेंद्र तुरकणे, सुधाकर जाधव, संभाजी तुरकणे आदी शेतकरी होते. कांदा उत्पादकांच्या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी या शिष्टमंडळाने हजारे यांच्याकडे केली. कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार, तर साठवणुकीसाठी पाचशे रुपये खर्च आला आहे. त्यामुळे सरकारने प्रतिक्विंटल २ हजार रुपये दर द्यावा. कांद्याचे भाव वाढले तर ते पाडले जातात, आता दर कोसळले तर त्याला मदत करण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे असे धोर्डे यांनी या वेळी सांगितले. हजारे म्हणाले, कांदा तसेच सर्वच शेतमालाच्या किमती या उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत. या प्रश्नावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. मात्र शेतकऱ्यांनी संघटित राहून लढा दिला तर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.